लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांनी मंगळवारी (दि.१७) उगारलेल्या बेमुदत संपाच्या हत्याराने पहिल्यांदाच प्रवाशांसाठी आरटीओ कार्यालयाच्या मदतीने खाजगी बसेस रस्त्यांवर उतरविण्याची नामुष्की राज्य शासनावर ओढावली. खाजगी वाहतूकदारांनीही मिळालेल्या संधीचा फायदा उचलत अवाच्या सव्वा भाडे उकळून प्रवाशांची अडवणूक केली. पूर्वकल्पना देऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संपाला एसटी महामंडळ आणि राज्य शासनच जबाबदार असल्याची टीका करीत एसटी कर्मचारी आणि प्रवाशांनी संताप व्यक्त केला.सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी आयोग संयुक्त कृती समितीतर्फे बेमुदत संपाची हाक देण्यात आली. त्यास कर्मचा-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने पहाटेपासूनच संपाचा परिणाम जाणवला. मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानकात सकाळपासूनच प्रवाशांचे हाल झाले. बहुतेक प्रवाशांना संपाची कल्पना नसल्याने त्यांनी चौकशी कक्षावर धाव घेतली; परंतु बससेवा बंद असल्याची माहिती देण्यात आली. एखादी तरी बस मिळेल या आशेने प्रवासी धडपड करीत एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी फिरत होते.संपाच्या परिणामामुळे राज्य शासनाने खाजगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपन्यांच्या मालकीच्या बसगाड्यांना प्रवाशांची वाहतूक करण्यास मान्यता दिली. त्यामुळे मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानक परिसरात खाजगी बसेस, खाजगी वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळाल्या.बसस्थानकात तासन्तास थांबूनही बस जाणार नसल्याची कल्पना येताच प्रवासी खाजगी बसगाड्यांची वाट धरीत होते. खाजगी वाहतूकदार थेट बसस्थानकात जाऊन प्रवाशांना घेऊन जात होते. संधीचा फायदा उचलत अनेक खाजगी वाहतूकदारांनी अधिक भाडे घेऊन प्रवाशांची आर्थिक लूट केली. पुण्यासाठी ६०० ते १,००० रुपयांपर्यंत भाडे उकळले. संपामुळे नाइलाजाने भुर्दंड सहन करून प्रवास केला.कर्तव्यावर जाणा-यांना बांगड्यामध्यवर्ती बसस्थानकात सकाळी नाशिकसाठी बस काढण्याचा प्रयत्न करणा-या एका चालकाला महिला कर्मचा-यांनी बांगड्या देण्याचा प्रयत्न केला. महिला कर्मचा-यांचा संताप पाहून चालक माघारी फिरला. सिडको बसस्थानकातील नियंत्रण कक्षात कर्तव्यावर आलेल्या दोन कर्मचा-यांवर महिला कर्मचारी आणि इतर कर्मचारी चांगलेच भडकले. या दोन्ही कर्मचाºयांनाही महिलांनी बांगड्या देण्याचा प्रयत्न केला. चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत कामावर जाणा-या कर्मचा-यांशी संपकरी कर्मचा-यांशी हुज्जत घातली.
एसटी ठप्प; खाजगी बस उतरविण्याची नामुष्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:13 AM