लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दुरुस्तीसाठी डेपोमध्ये उभी असलेली एसटी रस्त्यावर उतरवून ३४ प्रवाशांच्या जिवाशी खेळ करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्याला जाणाºया हिरकणी एसटीच्या समोरील दोन्ही चाकांचे बे्रक नादुरुस्त असताना सुमारे दीड-दोन तास ही गाडी रस्त्यावर धावत होती. सुदैवाने आगारातील प्रमुख मेकॅनिकच्या लक्षात ही बाब आल्याने त्याने चालकास फोन करून गाडी थांबविली आणि धोका टळला.राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेला संप शनिवारी मागे घेण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. औरंगाबाद-पुणे ही हिरकणी गाडी शनिवारी (दि.२१) औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातून रात्री ११.४५ वाजता पुण्याकडे निघाली. गंभीर गोष्ट अशी की, ही गाडी डेपोमध्ये दुरुस्तीसाठी उभी केली होती. तिच्या ब्रेकचे काम अर्धवट असतानाच ही गाडी चालकास देण्यात आली. पुढच्या दोन्ही चाकांच्या ब्रेकमध्ये ‘कॅचर’ नावाचा भागनव्हता.नादुरुस्त गाडीच ड्युटीवर गेल्याचे जेव्हा प्रमुख मेकॅनिकला कळाले तेव्हा एकच गोंधळ उडाला. त्यांनी घाईघाईने चालकाला फोन करून गाडी जेथे असेल तेथे थांबविण्याचे आदेश दिले. तोपर्यंत रात्रीचे १.३० वाजले होते आणि गाडी घोडेगावच्या पुढे पोहोचलेली होती. चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली. काही तासांनंतर आगारातून रिकामी बस पाठविण्यात आली व प्रवाशांना त्या बसमध्ये बसवून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
‘ब्रेक’शिवाय धावली एसटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:55 AM