औरंगाबाद : जिल्ह्यातील रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाच्या साध्या म्हणजेच लाल बसेस धावण्याचे प्रमाण वाढले आहे.जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात २१ शिवशाही, ५१ साध्या (लाल) आणि ६ हिरकणी बस धावल्या.
जिल्ह्यात १३ डिसेंबर रोजी २२ साध्या बसेस धावल्या होत्या. साध्या बसेसची संख्या आता दुपटीने वाढली आहे. जिल्ह्यात ६०१ एस.टी. कर्मचारी कर्तव्यावर हजर होते. हजर असलेल्या चालक-वाहकांच्या मदतीने मंगळवारी दिवसभरात ७८ बसगाड्या धावल्या. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वच आगारांतून एस.टी. धावली. या ७८ बसगाड्यांनी दिवसभरात ३१७ फेऱ्या केल्या. यातून ६११६ प्रवाशांनी प्रवास केला. अजिंठा लेणीत सर्वाधिक २ हजार ६५५ प्रवाशांनी प्रवास केला. जिल्ह्यातील एसटी कर्मचारी ८ जानेवारीपासून संपावर ( St Strike ) आहेत. एसटी शासनात विलीन करण्याच्या मागणीसंदर्भात ५ जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. तोपर्यंत संपावर ठाम राहण्याचा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
२० कर्मचाऱ्यांना नारळऔरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी एसटी महामंडळाकडून एकाही कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत २० संपकरी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करून घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांवर पोलिसांची नजरएसटी राज्य शासनात विलीन करण्यात यावी, अथवा आम्हाला स्वेच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सोमवारी एका निवेदनाद्वारे सिडको बसस्थानकातील २०१ एसटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. यासंदर्भात पोलिसांकडून मंगळवारी माहिती घेण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी बसस्थानक परिसरात येण्याचे टाळले.