औरंगाबाद : तेलंगणात दोन वर्षांपूर्वी तेथील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणासाठी ५२ दिवस आंदोलन केले होते. ते आंदोलन यशस्वी झाले. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे (ST Strike ) गेल्या ४६ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ५ जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे तेलंगणापेक्षा अधिक दिवस संप चालणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात आठ नोव्हेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणासाठी संप सुरू आहे. औरंगाबादेत शुक्रवारीदेखील बहुसंख्य कर्मचारी जिल्ह्यातील बसस्थानकात स्थान मांडून होते. संप पुकारणाऱ्यांनी संप मागे घेतला असला तरी आमचा दुखवटा सुरूच असल्याचे कर्मचारी म्हणाले. कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांची महामंडळाच्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घ्यावी, असे आदेश महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. मात्र, कोणत्याही तपासणीविना कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर पाठवले जात असल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोरोना पसरण्याची भीती प्रवासी वाहतुकीबद्दल व्यक्त केली जात आहे.
प्रवाशांचा जीव धोक्यातपुणे, नाशिक, जळगाव मार्गांवर बस सुरू झालेल्या असल्या तरी मुबलक बस नसल्याने अखेर प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहने दुप्पट भाडे आकारून प्रवाशांची कोंबाकोबी केली जात असल्याचे शुक्रवारी दिसून आले. पुण्यासाठी सहाशे तर जळगाव, बुलडाण्यासाठी तीनशे रुपये भाडे लागत असून, काळीपिवळी शिवाय इतर खासगी वाहनेही प्रवासी वाहतूक करीत आहेत.