कोरोनामुळे महसुलात चढउतार : मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले
औरंगाबाद : मुद्रांक शुल्क नोंदणी कार्यालय शासनाच्या तिजोरीत महसूल देणाऱ्यांपैकी महत्त्वाचे कार्यालय आहे; परंतु १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत कोरोनामुळे चढउतार करीत या विभागाला महसूल मिळवावा लागला. मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ५ मेनंतर पुन्हा हे कार्यालय हळूहळू सुरू झाले. वर्षभरात १७६ ते २०० कोटींच्या आसपास महसूल या कार्यालयाने मिळविला; परंतु सर्वाधिक ४५ कोटींचे उत्पन्न डिसेंबरमध्ये मिळाले.
सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या काळात मुद्रांक शुल्क नोंदणीत ३ टक्क्यांची सवलत शासनाने दिल्यानंतर मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारात उठाव आला. मे ते ऑगस्टपर्यंत ठप्प पडलेले व्यवहार सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान वेगाने होत गेले.
कोरोनाचे नियम पाळण्यात हलगर्जी
मुद्रांक कार्यालयात येताना कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच सॅनिटायझरदेखील उपलब्ध करून दिलेले आहे; परंतु मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी आलेल्या नागरिकांनी मास्क लावताना हलगर्जी केल्याचे दिसून आले. सोशल डिस्टन्सिंगही पाळले नाही.
जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान झालेली खरेदी-विक्री
वर्ष २०२० च्या जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या २३ तारखेपर्यंत बऱ्यापैकी व्यवहार झाले. त्यानंतर मे ते जुलै अखेरपर्यंत चढउतार राहिला. ऑगस्ट महिन्यात औरंगाबादमध्ये ५ हजार २१४ व्यवहारांतून २७ कोटी, सप्टेंंबरमध्ये ७ हजार ३०० खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. त्यातून २७ कोटी, तर ऑक्टोबरमध्ये औरंगाबादमध्ये ६ हजार ९०२ व्यवहार झाले. २८ कोटींचा महसूल त्यातून मिळाला. नोव्हेंबरमध्ये देखील असेच प्रमाण राहिले.
डिसेंबर महिन्यात झालेले व्यवहार
केवळ डिसेंबर २०२० या महिन्यात ११ हजार २०३ व्यवहार जिल्ह्यात झाले. यातून ४४ कोटी १६ लाख ५७ हजार ८०१ रुपयांचा महसूल शासन तिजोरीत आला.
किती कोटींचा महसूल मिळाला?
गेल्या वर्षभरात जिल्ह्यात सरासरी २०० कोटींच्या आसपास महसूल मिळाला आहे.
कोट...
मुद्रांक उपमहानिरीक्षक सोहम वायाळ यांनी सांगितले, शुल्क नोंदणीत ३ टक्के सवलत मिळाल्यानंतर तिन्ही जिल्ह्यांत बऱ्यापैकी महसूल मिळाला. गोळाबेरीज अजून सुरू आहे, तर जिल्हा मुद्रांक अधिकारी दीपक सोनवणे यांनी सांगितले की, वर्षअखेरीस डिसेंबर महिन्यात सर्वाधिक ४५ कोटींच्या आसपास महसूल जिल्ह्याला मिळाला.