छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्या विरोधात बंडखोरी केलेले शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख तथा अपक्ष उमेदवार रमेश पवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून पक्षाचे तालुकाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
फुलंब्री विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने भाजपाच्या अनुराधा चव्हाण या उमेदवार असताना शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश पवार यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर महायुतीतील नेत्यांनी आदेश देऊनही पवार यांनी उमेदवारी अर्ज परत घेतला नाही. आता ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर रविवारी दि. १० नोहेंबर रोजी शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारशीवरून शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल जिल्हाप्रमुख रमेश पवार, फुलंब्री तालुकाप्रमुख चंद्रकांत जाधव यांचे शिंदेसेनेतून निलंबन करण्यात आल्याचे पत्र शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांनी काढले. या कारवाईमुळे महायुतीमधील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि आरपीआय (ए) या पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात समन्वय असल्याचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला आहे.
फडणवीस यांच्या सभेनंतर कारवाईमहायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी शहरात सभा झाली. ही सभा पार पडून २४ तास उलटत नाहीत तोवर महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या पवार आणि जाधव यांना शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. या कारवाईमुळे मुख्यमंत्री शिंदे भाजपा उमेदवाराच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे.