औरंगाबाद : शहराच्या कचराकोंडीला सहा महिने उलटल्यानंतर आता मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत झोननिहाय कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रसामुग्री, कंत्राटदार नेमण्याच्या प्रक्रियेला मंजूर देण्यात आली. त्याचप्रमाणे हर्सूल, चिकलठाणा आणि पडेगाव येथे कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. या कामावर तब्बल २६ कोटी रुपये खर्च होणार आहे.
शहरात कचऱ्यासंदर्भात प्रचंड ओरड होत असताना महापालिकेने झोननिहाय मशीन खरेदी करणे, मशीन चालविण्याचे कामही कंत्राटदारानेच करावे या आशयाची निविदा ८ मे रोजी प्रसिद्ध केली. १७ मे रोजी दोन निविदा आल्या. दोन महिने मनपाने निविदा उघडल्याच नाहीत. १९ जुलै रोजी निविदा उघडण्यात आल्या. स्पर्धेत नागपूर येथील मे. वेस्ट बिन सोल्युशन कंपनीने काम मिळविले. कंपनीला २ कोटी ७५ लाख रुपयांच्या मशीन नऊ झोनमध्ये बसवायच्या आहेत. दररोज एका मशीनवर १६ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. मशीन चालविण्याचा खर्च म्हणून मनपा कंपनीला दरमहा एका मशीनपोटी ३ लाख ७६ हजार रुपये देणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन मशीन बसविण्यात येणार आहेत. स्क्रीनिंग, श्रेडिंग, बेलिंग, अशा स्वरूपाच्या तीन मशीन प्रत्येक केंद्रावर राहतील. प्रक्रिया करण्याचे काम कंपनीला तब्बल दहा वर्षे करावे लागेल.
तीन केंद्रांचे बांधकामविभागीय आयुक्तांच्या कचरा संनियंत्रण समितीने मंजूर केलेल्या हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव येथे कायमस्वरूपी अत्याधुनिक कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २६ कोटी ८६ लाख रुपये खर्च करण्यात येतील. शासनाने मंजूर केलेल्या ९० कोटी रुपयांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. स्पर्धेत मे. एन.के. कन्स्ट्रक्शनने हे काम मिळविले. मंगळवारी स्थायी समितीनेही या कामाला मंजुरी दिली.
आणखी दोन मोठ्या निविदाशहरातील संपूर्ण कचरा नागरिकांच्या दारावर जाऊन जमा करण्यासाठी खाजगी कंपनीची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी मनपाने निविदा प्रक्रिया सुरू केली असून, लवकरच ही निविदाही अंतिम करण्यात येईल. त्याचप्रमाणे चिकलठाणा येथे कचऱ्यावर प्रक्रिया करणारे मुख्य केंद्र उभारण्यात येणार आहे. नक्षत्रवाडीत बायोमिथेन गॅस प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. यासाठीही निविदा प्रसिद्ध केलेली आहे.