लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘स्वाईन फ्लू’चा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गुरूवारी दिलेत. पालकमंत्र्यानी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास स्वाईन फ्लूसह डेंग्यू, मलेरिया आणि कुपोषणाचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. पावसाच्या दिवसांत स्वाईन फ्लूचा संसर्ग पाहता औषधी हवी असल्यास जिल्हा नियोजन समितीमार्फत पुरेसा पुरवठा करता येईल, त्यासाठी आवश्यक असल्यास प्रस्ताव देण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक अरूण राऊत, सुपर स्पेशालिटीचे वैद्यकीय अधिक्षक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव यांच्यासह मलेरिया तथा हिवताप अधिकारी उपस्थित होते. ‘स्वाईन फ्लू मूत्यूची चोरपावले’ या वृत्त मालिकेतून ‘लोकमत’ने ‘स्वाईन फ्लू’चा वाढता प्रादूर्भाव आणि यंत्रणेच्या लपवा छपवीवर प्रकाशझोत टाकला. या वृत्त मालिकेची दखल घेवूृन पालकमंत्र्यानी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेची झाडाझडती घेतली. आढावा बैठकीत ‘लोकमत’चा उल्लेख करुन ‘स्वाईन फ्लू’च्या संसर्ग आणि मृत्यूच्या संख्येबाबत पारदर्शकता बाळगावी, कुठलीही लपवाछपवी करू नये तथा आरोग्य यंत्रणेने जनजागृतीवर भर द्यावा, अशी सूचना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना केल्या. जिल्ह्यात ‘स्वाईन फ्लू’बाबत तपासणी करण्यात येत असून आतापर्यत ११ हजार ४०० पेक्षा अधिक रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाझिटीव्ह आढळून आलेले ४७ रूग्ण ठणठणीत आहेत आणि तूर्तास ‘स्वाईन फ्लू’ स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक राऊत यांनी पालकमंत्र्याना दिली. पालकमंत्र्यानी ‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे त्यावरील उपाययोजना, औषधांचा साठा याबाबतची माहीती जाणून घेवून आवश्यक ते दिशा निर्देश दिलेत.
‘स्थायी’त गाजले शिक्षक समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:15 AM