वेरूळ (जि. औरंगाबाद) : अधिक मासानिमित्त वेरूळ येथील बारावे ज्योर्तिलिंग श्री घृष्णेश्वर महादेवाच्या अतिरुद्र अभिषेकास करवीर पीठाधीश्वर शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते व २५१ ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात ४ जूनपासून सुरुवात झाली. ८ जूनपर्यंत हा अभिषेक चालणार असल्याने या काळात भाविकांसाठी गाभाऱ्यात प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना पाच दिवस सभामंडपातूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. यंदाचा अतिरुद्र अभिषेक दर्भतीर्थाने (कुश) करण्यात येत आहे.सोमवारी सकाळी ८ वाजता करवीर पीठाधीश्वर शंकराचार्य नृसिंह भारती यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सर्वत्र सडा-सारवण करून त्यावर सुरेख रांगोळ्या काढून या मिरवणुकीचे वेरूळ ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. मंदिर परिसरात दिवसभर ‘हर हर महादेव’चा जयघोष सुरू होता. वेरूळ ग्रामस्थांसाठी ६ जून रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट वेरूळ अंतर्गत अतिरुद्र समिती व समस्त ब्रह्मवृंदांतर्फे दर तीन वर्षांनी अधिक महिन्यात विश्वशांती व सकल जनकल्याणार्थ हा सोहळा साजरा करण्यात येतो. अतिरुद्र या पूजा प्रकारात महादेवावर १४६४१ अभिषेक होतील म्हणजेच ११ महारुद्र अभिषेक होतील. यासाठी महाराष्ट्रातील विद्वान ब्राह्मण या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. अतिरुद्र समितीच्या अध्यक्षपदी परेश पाठक, उपाध्यक्ष अनिल जोशी, समिती सदस्य योगेश वितखेडे, सुमित बाबरेकर, केदार जोशी, कमलाकर विटेकर, चंद्रकांत शेवाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.या सोहळ्यासाठी श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक अग्निहोत्री, संजय, योगेश टोपरे, शशांक टोपरे, सुनील शास्त्री, सुनील विटेकर, रावसाहेब शास्त्री, प्रणव पाठक, अनिल देवपाठक, संजय म. वैद्य, गणेश वैद्य, सर्वेश्वर शुक्ल, रवी पुराणिक, राजेंद्र कौशिके, मंगेश पैठणकर, गणेश बाबरेकर, रवींद्र वैद्य, संजय जोशी, नाना गुरू, संतोष जोशी, सुधीर टोपरे, रवींद्र कागदे व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.यंदाच्या सोहळ्यास विशेष महत्त्वकांचीपीठ शंकराचार्य श्री श्री जयेंद्र सरस्वती यांची अनुमती घेऊन १९८५ मध्ये घृष्णेश्वरास दुधाचा पहिला अतिरुद्र अभिषेक करण्यात आला होता. घृष्णेश्वर हे बारावे ज्योर्तिलिंग असून यंदाचा अभिषेकही हा बारावा असल्याने या सोहळ्यास अनन्यसाधारण महत्त्व राहणार आहे. या सोहळ्यासाठी इतर ११ ज्योर्तिलिंगांच्या पुरोहितांनाही येथे आमंत्रित करण्यात आले आहे. अखंडित चालणाºया या अतिरुद्रास तीन तासांकरिता एका वेळी चाळीस ब्रह्मवृंद मंत्र पठण करतील, तर या काळात मंदिरामध्ये गणपती अथर्वशीर्ष, सप्तशती, महामृत्युंजय जप, घृष्णेश्वर भगवान जप, ज्ञानेश्वरी पारायण, गुरुचरित्र पारायण, नवग्रह जप, नवनाथ पारायणही चालेल. ८ जून रोजी या अतिरुद्राची समाप्ती होणार असून, यावेळी शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.यापूर्वी झालेले अतिरुद्र अभिषेक१९८५ -दूध१९८८ -दही१९९१ -तूप१९९४ -मध१९९७ -उसाचा रस२००० -श्रीफळ२००३ -नर्मदा नदी तीर्थ२००६ -गंगा नदी तीर्थ२००९ - चार सरोवरांचे तीर्थ२०१२ - आंब्याचा रस२०१५ -शिव सरोवर (येळगंगा)२०१८ -दर्भ (कुश)शेतकरी व दिव्यांग बांधवांना मदतधर्मादाय आयुक्त श्रीकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि अतिरुद्र समितीच्या वतीने शेतकरी आणि दिव्यांग बांधवांना नवीन कपडे व शिधा देण्यात येणार असून, शेतकरी व दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि अतिरुद्र समितीच्या वतीने करण्यात आले आहे.फोटो कॅप्शन......वेरूळमध्ये भक्तिभावाचे मंगलमय सूर... वेरूळ येथील बारावे ज्योर्तिलिंग श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरात अधिक मासानिमित्त अतिरुद्र अभिषेक सोहळ्यास करवीर पीठाधीश्वर शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते व २५१ ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात प्रारंभ झाला. यानिमित्त गावातून शंकराचार्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत हजारो भाविक व महिला सहभागी झाल्या होत्या.
घृष्णेश्वर मंदिरात दर्भतीर्थाने अतिरुद्र अभिषेक सोहळ्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 12:41 AM