लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बीएसएनएल टॉवर उपकंपनी स्थापन करून त्याद्वारे टेलिकॉम उद्योगावर कब्जा मिळवू पाहणा-या देशी-विदेशी कंपन्यांना सरकारची पाठराखण मिळत आहे. बीएसएनएलच्या मुळावर घाव घालून टॉवर उपकंपनी स्थापन करण्याचा निर्णय रद्द करावा आणि बीएसएनएल कर्मचाºयांना तिसरा वेतन करार लागू करावा, अशा मागण्या करत बीएसएनएल कर्मचा-यांच्या दोनदिवसीय लाक्षणिक संपाला मंगळवारी (दि.१२) सुरुवात झाली.हा संप देशव्यापी स्वरूपाचा असून, यामध्ये एकूण १३ संस्था सहभागी झाल्या आहेत. सिडको परिसरातील संचार सदन येथे स. ११ वाजता संपाला सुरुवात केली. यावेळी जाहीर सभा घेऊन दोन दिवस शांततेच्या माध्यमातून संप पुकारण्याचे आवाहन करण्यात आले. डॉ. भालचंद्र कांगो यांनी सभेला मार्गदर्शन करून संपाला पाठिंबा दर्शवला. कॉ. जॉन वर्गीस, कॉ. रंजन दाणी, कॉ. एस. आर. वाणी, कॉ. विलास सवडे, कॉ. शिवाजी चव्हाण, कॉ. भीमराव गणकवार यांनी या संपाचे नेतृत्व केले.१ जानेवारी २०१७ पासून बीएसएनएल कर्मचा-यांचा वेतन करार प्रलंबित आहे. वेतनवाढीचा संबंध कंपनीच्या नफ्याशी जोडला जात आहे. नफ्याची अट शिथिल करण्याची शिफारस करावी आणि कॅबिनेटने त्यास तात्काळ मंजुरी देऊन वेतन करार लागू करावा, अशी मागणीही यातून पुढे आली. जाहीर सभेनंतर कर्मचा-यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे जाऊन खा. चंद्रकांत खैरे यांच्याकडे निवेदन दिले.बुधवारी (दि. १३) संचारसदन येथे सकाळी ११ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, उद्धव भवलकर यांची उपस्थिती असणार आहे.
बीएसएनएल कर्मचा-यांचा संप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 1:07 AM