औरंगाबाद : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १३ महिन्यांपासून बंद कोचिंग क्लासेसच्या असोसिएशनने उपोषण, धरणे आंदोलन, मुख्यमंत्री सचिवालये, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये तसेच विभागीय आयुक्त कार्यालये येथे रितसर निवेदने दिली. मात्र, शासनदरबारी याची कोठेही नोंद घेण्यात आली नाही. विविध क्षेत्रांना आर्थिक मदत झाली. त्यातही कोचिंग क्लासेस दुर्लक्षित राहिले. आता १७ मेपासून क्लासेस नियमांचे पालन करून सुरु करण्याची परवानगी द्या, अन्यथा आत्मदहनाची परवानगी द्या, अशी मागणी कोचिंग क्लासेस असोसिएशनने केली आहे.
महाराष्ट्रात जवळपास २० ते २५ हजारांपेक्षा अधिक कोचिंग क्लासेस आहेत. सुमारे २० ते २५ लाख लोकांचा उदरनिर्वाह क्लासेसवर अवलंबून आहे. १३ महिन्यांपासून क्लासेस पूर्णपणे बंद असल्याने, क्लासेस संचालक व खासगी शिक्षक यांच्या उदरनिर्वाहाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. कोचिंग क्लासेसच्या जागामालकांनी क्लासेसचे भाडे माफ करण्यासंबंधी शासनाने त्वरित अध्यादेश काढावा. त्याचबरोबर कोचिंग क्लासेसचे एक वर्षाचे जीएसटी,व्यवसाय कर, आयकर कर (उत्पन्नच नाही), वाढीव लाईट बिल व स्थानिक कर माफ करावे, सलग १३ महिन्यांपासून क्लासेस बंद असल्याने आमचे आर्थिक उत्पन्न शंभर टक्के थांबल्यामुळे शासनाने आर्थिक मदत द्यावी, विविध वित्तीय संस्थांचे १ एप्रिल २०२० पासून ते व्यवसाय सुरळीत होईपर्यंत हप्ते स्थगित करण्यात यावे, त्याचबरोबर सीबील स्कोअर खराब होऊ देऊ नये, १७ मेपासून महाराष्ट्रातील सर्व क्लासेस संचालकांना दहावी, बारावीच्या वर्गांना नियमावलीच्या अधीन राहून परवानगी द्यावी, डबघाईस आलेली आर्थिक परिस्थिती, कर्जबाजारीपणा, होणारी उपासमार या सर्व बाबींवर सहानुभूतीपूर्वक विचार करावा किंवा आम्हाला सामूहिक आत्मदहनाची परवानगी द्यावी, असे राज्य अध्यक्ष प्रा. पी. एम.वाघ, सरचिटणीस प्रा. ज्ञानेश्वर ढाकणे, उपाध्यक्ष प्रा. संदीप मस्के, कोषाध्यक्ष प्रा. आप्पासाहेब मस्के, समन्वयक प्रा. अजाबराव मनवर आदींसह सर्व जिल्हाध्यक्षांनी निवेदनात म्हटले आहे.