औरंगाबाद : जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने शहरातील १६८ व्यापाऱ्यांना नोटिसा पाठविल्या आहेत.
आडत बाजारातील किराणा मार्केटमध्ये लीज डीडवर घेतलेल्या जागेत १५ दिवसात बांधकाम सुरू करण्याचा इशारा या नोटीसद्वारे देण्यात आला आहे. मोंढ्यातील होलसेल व्यापाऱ्यांना बाजार समितीत किराणा मार्केटसाठी जागा देण्यात आली आहे. यात ३४० प्लॉट पाडण्यात आले. त्यातील सर्व प्लॉट विकण्यात आले आहेत. मोंढ्यातील ११९ व्यापाऱ्यांनी येथील १५४ प्लॉट खरेदी केले. मात्र, जागेच्या किमतीवरून न्यायालयात वाद पोहचला आहे. यामुळे बाजार समितीने या व्यापाऱ्यांना नोटिसा पाठविल्या नाहीत. पण, उर्वरित १८६ प्लॉट धारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ यांनी सांगितले की, ज्यांना नोटिसा पाठविल्या आहेत त्यांचे दीड वर्षापूर्वी खरेदीखत झाले आहे. खरेदीखत केल्यापासून तीन वर्षांत बांधकाम करून प्रत्यक्ष व्यवहार सुरू करण्याची अट ठेवण्यात आली होती. मात्र, दीड वर्ष झाले. अजूनही त्या व्यापाऱ्यांनी बांधकामाचे डिझाईन मंजूर करून घेतलेले नाही. बांधकाम देखील चालू केले नाही.
चौकट
सर्वसाधारण सभेवर व्यापाऱ्यांचा बहिष्कार
राज्य सरकारने जुलै २०२१ मध्ये बाजार समितीवर प्रशासकीय संचालक मंडळ नेमले आहे. या समितीचे मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी २७ सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येत आहे. मात्र, या प्रशासकीय मंडळावर एकाही व्यापारी प्रतिनिधीला घेतले नाही. याचा राग व्यक्त करण्यासाठी आडत व्यापारी, मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी वार्षिक सभेवर बहिष्कार घातला आहे.