औरंगाबाद राज्याची पर्यटन राजधानी असून, याठिकाणी अजिंठा आणि वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्या पाहण्यासाठी देशी आणि परदेशी पर्यटक येतात. तसेच जागतिक स्तरावरील बुद्धिस्ट केंद्र म्हणून विकसित होत असल्याने, मलेशिया, इंडोनिशिया, श्रीलंका, जपान, चीन यांसह अन्य बुद्धिस्ट देशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक औरंगाबाद जिल्ह्यात येतात. बुद्धिस्ट संस्कृतीचे अभ्यासकदेखील शहरात येत असल्याने त्यांना या विमानसेवेचा फायदा होणार आहे. सध्या आठवड्यात केवळ दोन दिवस एअर इंडियाचे विमान येतात, इतर विमान कंपन्यांची विमाने औरंगाबाद ते दिल्ली,औरंगाबाद ते मुंबईसाठी फुल्ल असतात, त्यामुळे एअर इंडियाने दिल्ली आणि मुंबई शहरासाठी विमान सेवा आणि फेऱ्या वाढवाव्यात, त्याचबरोबर नागपूर, पुणे, गोवा, जयपूर, जोधपूर या शहरातदेखील विमानसेवेचा विस्तार करण्याची मागणी केली.
औरंगाबाद विमानतळास २०१५ पासून कस्टमर एअर पोर्टचा दर्जा देण्यात आलेला होता. आता विमानतळावर स्वतंत्र टर्मिनल, प्रशस्त इमारत आणि इतर पायाभूत सुविधा लक्षात घेता खा. डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत विमान सुविधा वाढविण्याबाबत राज्यसभेत प्रश्न विचारला.
शहरालगत पाच औद्योगिक वसाहती असून, औरंगाबाद जागतिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र असल्याने विमान सेवेचा विस्तार होणे आवश्यक असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.