तालुक्यातील ९ महसुली मंडळात एकूण १३,८२१ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाचे उत्पादन घेण्यात आलेले आहे. सुरुवातीला पावसाच्या पाण्यामुळे एकूण उत्पन्नाच्या २५ टक्के शेतकऱ्यांच्या मका पिकाची वाताहत झाली. मका खरेदी करण्यासाठी शासनाने खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मका खरेदी सुरू केली होती. सदरची खरेदी १ नोव्हेंबर रोजी सुरू होऊन ३१ डिसेंबर रोजी थांबवावी असे शासनाचे आदेश होते. तालुक्यातील मका खरेदी करण्यासाठी खरेदी-विक्री संघाकडून मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती.
दीड हजारांपैकी शंभर जणांकडून खरेदी
गंगापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात असलेल्या मका खरेदी केंद्रावर एक हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ ६७ शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यात आली. लासूर येथील मका खरेदी केंद्रावर ४६१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. यापैकी १२ शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यात आली. ऑनलाइन नोंदणी केलेल्या सुमारे १७०० शेतकऱ्यांची मका खरेदीविना तशीच पडलेली आहे.