लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील श्री क्षेत्र घोटा (देवी) येथील श्री तुळजादेवी संस्थान येथे २१ सप्टेंबरपासून श्री शारदीय नवरात्र व दसरा महोत्सवास सुरूवात होणार आहे. यानिमित्त संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.महाराष्टÑाची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती घोटा येथील श्री तुळजादेवीची असल्याने श्री क्षेत्र घोटा येथील आई जगदंबेचे मंदिर हे हजारो भाविकांचे श्रध्दास्थान आहे.श्री क्षेत्र घोटा येथे शके १८०५ मध्ये प.पू. नित्यानंद स्वामी महाराज यांच्या भक्तीमुळे श्री क्षेत्र घोटा येथे श्री तुळजादेवी प्रत्यक्ष प्रकट झाल्याची आख्यायिका ऐकावयास मिळते. येथील जगदंबा मातेची मूर्ती ही स्वयंभू असून मूर्ती काळ्या पाषाणाची, कोरीव, चतुर्भुज सिंहावर आरूढ असून अतिशय नयन मनोहारी असल्याने या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची नेहमी मांदियाळी बघावयास मिळते.येथील श्री क्षेत्र घोटा (देवी) चे दर्शन घेताच भाविकांच्या इच्छीत मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने या ठिकाणी भाविकांची गर्दी होत असते.
श्रीक्षेत्र घोटा येथील नवरात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:04 AM