औरंगाबाद : चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे (सी.एम.आय.ए.) घाटी रुग्णालयात उभारण्यात आलेला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सोमवारी घाटी प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आला. या प्रकल्पातून दररोज १२५ जम्बो सिलिंडर इतक्या ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याकडे घाटीचे पाऊल पडले आहे.
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या हस्तांतरप्रसंगी खा. इम्तियाज जलील, खा. भागवत कराड, आ. सतीश चव्हाण, आ. संजय शिरसाट, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत, उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू, सचिव सतीश लोणीकर, माजी अध्यक्ष राम भोगले, प्रसाद कोकीळ आदींची उपस्थिती होती. मेडिसीन विभागासमोरील जागेत हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. यातून रोज १२५ जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होईल. यातून ६० खाटांना ऑक्सिजन पुरविणे शक्य होणार असल्याचे सतीश लोणीकर यांनी सांगितले.
प्रकल्पाच्या हस्तांतरणानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, लिक्विड ऑक्सिजनच्या बाबतीत घाटीत मोठी क्षमता आहे. ५३ हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन साठवणुकीची क्षमता असून, ही क्षमता आणखी २० हजार लिटरने वाढणार आहे. जिल्हाभरातही ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प केले जात आहेत. कोरोना काळात उद्योजकांनी मोठी मदत केली. सर्वांच्या प्रयत्नांमुळे औरंगाबाद शहर लेव्हल-१ मध्ये आले. त्यामुळे शहरात सर्व काही खुले झाले. पण शिस्त पाळली नाही तर ही लेव्हल बिघडण्याचा धोका आहे. त्यामळे सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. खा. जलील म्हणाले, उद्योजकांनी जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे. आ. चव्हाण म्हणाले, मनुष्यबळ कमी असतानाही घाटीतील कर्मचारी चांगले काम करीत आहेत. आ. शिरसाट म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटनस्थळेही सुरु करण्याची गरज आहे.
कार्यक्रमास डाॅ. कैलास झिने, डाॅ. सुधीर चौधरी, डाॅ. सुरेश हरबडे, डाॅ. ज्योती बजाज-इरावणे, डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, डाॅ. राजश्री साेनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे के. एम. आय. सय्यद, अजय काळे आदी उपस्थित होते.
औरंगाबादेत ‘पीजीआय’ची मागणी
खा. भागवत कराड म्हणाले, चंडीगढप्रमाणे औरंगाबादेत पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे औरंगाबादचे नाव वैद्यकीय दृष्टीने देशाच्या नकाशावर येईल. घाटीत सुविधा चांगल्या आहेत. तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने खबरदारी घेतली पाहिजे.