औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक म्हणजे इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता आठवीसाठीची अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. १७ फेब्रुवारी २०१९ रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात पाचवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज करता येतील. १ डिसेंबर ही नियमित तर १६ डिसेंबरपर्यंत विलंबासह शुल्क भरण्याची मुदत असणार आहे. अतिविशेष विलंब शुल्कासह १ जानेवारीपर्यंत अर्ज भरण्यासाठीची मुदत देण्यात आली आहे.
यंदा प्रश्नपत्रिकेच्या काही स्वरुपात बदल करण्यात आला असून, दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरुपाचे आहेत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उत्तरांच्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल, मात्र आठवीसाठी परीक्षेच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २० टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या चार पयार्यांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे.