चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे हिरवी मिरची खरेदीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी लिलाव पद्धतीने मिरचीची खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे, तसेच हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
चिंचोली लिंबाजीसह नेवपूर, वाकी, तळणेर, रेऊळगाव, घाटशेंद्रा, वडोद, लोहगाव, बरकतपूर, रायगाव, गणेशपूर, वाकद, जामडी, दहीगाव, शेलगाव, दिगाव, खेडी या गावांसह परिसरातील जवळपास ६० खेड्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पूर्व हंगामी मिरचीची लागवड करतात; मात्र तालुक्यात मिरचीचे मार्केट उपलब्ध नसल्याने त्यांना सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार, आमठाणा, घाटनांद्रा, भराडी येथील मार्केटला मिरची विक्रीसाठी न्यावी लागत होती. अनेक वेळा अचानक मालाची आवक वाढल्यास येथील व्यापाऱ्यांकडून मिरचीचे भाव पाडत होते. यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती, तसेच वाहतुकीचा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत होता. परिसरातील मिरचीची उपलब्धता लक्षात घेता स्थानिक अद्रकचे व्यापारी व इतरांनी आठ दिवसांपासून चिंचोली लिंबाजी येथे हिरवी मिरची खरेदीला सुरुवात केली. शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे लिलाव पद्धतीने मिरचीची खरेदी होत असल्याने मिरचीला चांगला दर मिळत आहे.
कोट..
चिंचोली लिंबाजी येथे हाकेच्या अंतरावर मिरची मार्केट सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांची परवड कमी झाली आहे. यामुळे अतिरिक्त खर्च तसेच वेळेची फार मोठी बचत झाली आहे.
-मेघशाम देशमुख, शेतकरी, नेवपूर.
कोट...
शेतकऱ्यांच्या मागणीवरून आम्ही १० ते १५ व्यापाऱ्यांनी येथे लिलाव पद्धतीने मिरची खरेदीला प्रारंभ केला आहे. त्यांना योग्य दर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-पंडित गव्हांडे, व्यापारी, वाकी.
फोटो : चिंचोली लिंबाजी येथे हिरवी मिरची लिलाव पद्धतीने खरेदी करताना व्यापारी.
140721\20210711_163347.jpg
चिंचोली लिंबाजी (ता.कन्नड) येथे हिरवी मिरचीची लिलाव पद्धतीने खरेदी करताना व्यापारी .....छाया प्रशांत सोळुंके