औरंगाबाद : वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून सेव्हन हिल उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली; परंतु पुलावरून जाण्याऐवजी अनेक वाहनधारक साईड रोडचाच वापर करीत असल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आज सायंकाळी पुन्हा एक वेळ अनुभव आला. सायंकाळी ४ वाजेपासून साधारण सुमारे तासभर ट्रॅफिक जाम झाली. दुपारनंतर सिडको-हडको, गारखेडा भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याच वेळेला कारखान्यांतील कामगारांची वाहतूक करणाऱ्या आणि शाळकरी मुलांच्या बस, दुचाकी, चारचाकी तसेच रिक्षांचालकांनी एकच घाई केली. परिणामी, गर्दी वाढल्याने सेव्हन हिल उड्डाणपुलाच्या चारही बाजंूनी वाहतूक खोळंबली. अर्ध्या तासानंतर पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.1गारखेडा, सातारा, जवाहर कॉलनी, पुंडलिकनगरातील नागरिकांना जालना रोडवर आल्यानंतर उजवा किंवा डावा टर्न मारून शहर किंवा सिडको गाठावे लागते. त्यामुळे पुुलावर जाण्याचा प्रश्नच येत नाही; परंतु जालना रोडवरून क्रांतीचौक किंवा सिडकोकडे ये-जा करणारे वाहनधारक पुलाचा वापर न करता सरळ साईड रोडनेच आपले वाहन दामटत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. ज्या करणासाठी पूल उभारण्यात आला त्याचे सरळ उल्लंघन केले जात असल्याचे चित्र येथे दररोज पाहावयास मिळत आहे. पोलिसांनी नाकेबंदी करून रिक्षांना साईड रोडने जाण्यास मज्जाव केला होता. कालांतराने ही प्रक्रिया थांबली अन् गत आठवड्यापासून वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. 2वाहतूक पोलिसांची गरज असतानाही ते गैरहजर राहत असल्याने परिणामी शहरवासीयांना विलंबाचा फटका बसत आहे. याचदरम्यान दवाखान्यांत जाणाऱ्या वाहनांनाही वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. 3पावसात वाहनाधारकांनी घर गाठण्यासाठी घाई केली अन् पुलाजवळ एमजीएम ते गारखेडा परिसराकडे जाणाऱ्या वाहनांची रांग लागली होती, तर जालना रोडवर सिडकोकडून क्रांतीचौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही रांग लागली होती. पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती मिळाल्याने त्यांनी तात्काळ उड्डाणपुलाजवळ जाऊन वाहतुकीची कोंडी सोडविली; परंतु सातत्याने होणारी ही कोंडी थांबविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न आवश्यक आहेत.
पावसात ट्रॅफिक जाम होण्यास प्रारंभ
By admin | Published: July 09, 2014 12:38 AM