औरंगाबाद : महिलांचे खऱ्या अर्थाने सबलीकरण करावयाचे असेल तर त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून करा. महिलांनीसुद्धा आपल्या घरात आपल्या आई-वडिलांप्रमाणेच सासू-सासऱ्यांना वागणूक दिली पाहिजे, तरच स्त्री-पुरुष समानतेचा गाडा सुरळीत चालवू शकू, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका प्रा.भारती भांडेकर यांनी केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने महिला दिनानिमित्त आयोजित महिला सन्मान सोहळ्यात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. कोरोनाच्या मर्यादा लक्षात घेऊन प्रातिनिधिक आठ कर्तृत्ववान महिलांचा गांधी भवनात हा सत्कार करण्यात आला. यावेळी जालना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष ॲड. कीर्ती उढाण, डॉ. एम. एस. गोरडे, विवेकानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अमर पाटील शिसोदे, शिवाजीराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सविता वावगे, प्रा. डॉ. स्मिता दीक्षित, डॉ. तेजस्विनी कल्याण काळे, माधुरी पाटील, प्रा.जोहरा फातिमा सिद्दीकी, डॉ. वैशाली मसलेकर, गायत्री मोटे, कल्पना बनकर पाटील, डॉ.पौर्णिमा वाहने आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. उल्हास उढाण यांनी, सूत्रसंचालन अमित कुटे यांनी तर आभार दादाराव कांबळे यांनी मानले.