छत्रपती संभाजीनगर : लष्करासाठी आत मुख्यालयात चहा व किरकोळ नाष्ट्याचे वाटप करण्याचे काम करणाऱ्या मुलाने थेट बाहेर विक्रीस बंदी असलेली (ओन्ली फॉर डिफेन्स) दारूची तस्करीच सुरू केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आकाश गोकुळ महानोर (रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) याला केवळ लष्करासाठी असलेल्या ९१ दारूच्या बाटल्यांसह अटक केल्यानंतर ही बाब निदर्शनास आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला काही दिवसांपूर्वी पडेगाव परिसरात केवळ लष्करासाठी असलेली दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. अधीक्षक संतोष झगडे यांच्या आदेशावरून निरीक्षक ए.बी. चौधरी, गणेश पवार, गणेश नागवे यांनी गुरुवारी बाळापूर फाट्याजवळ सहकाऱ्यांसह सापळा रचला. त्यात मोपेड दुचाकीवर संशयास्पद हालचाल करणारा तरुण आढळताच त्यांनी त्याला पकडले. त्याच्या ताब्यात लष्करासाठी विक्रीकरिता असलेल्या दारूचा साठा आढळला. त्याला यात योगेश भगवान राजपूत व यश संजय यादव हे विक्रीसाठी मदत करत होते. त्यांना ताब्यात घेत पथकाने अटक केली. प्रवीण पुरी, ए.के. सपकाळ, चेतन वानखेडे, ज्ञानेश्वर सांबारे, हनमंत स्वामी, किशोद सुंदर्डे यांनी कारवाई पार पाडली.
तब्बल ९१ बाटल्यांचा साठालष्कराची दारू विनाकर असल्याने बाजार मूल्यापेक्षा स्वस्त असते. ती केवळ लष्कर सेवेशी संबंधित व मिलिटरी कँटीनचे सदस्य असलेल्यांनाच विकता येते. महानोरच्या ताब्यात अशा ७५० एमएलच्या ९१ दारूच्या बाटल्या आढळल्या. पाच महिन्यांपूर्वी त्याला कंत्राटी पद्धतीने लष्कराच्या आत काही भागात चहा पुरवण्याचे काम मिळाले हाेते. तेथे झालेल्या ओळखीतून त्याने तेथून थेट बॉक्सच बाहेर आणून विक्री सुरू केली. महानोरकडे लष्कराची दारू असल्याचे कळाल्याने अल्पावधीत परिसरात त्याची मागणी वाढली होती.
ती व्यक्ती कोण ?लष्कराच्या साठ्यातून दारूचा साठा पुरवणाऱ्याचे व महानोरचे संभाषण, ऑनलाइन पैशांचे व्यवहारही विभागाच्या हाती लागले आहेत. त्यावरून त्यांनी छावणी प्रशासनाला पुढील कारवाईसाठी पत्रव्यवहार केल्याचेही सूत्रांनी सांगितले.