छत्रपती संभाजीनगर : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाने राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. मात्र, ड्रग्जचे सेवन मुंबई, पुण्यापर्यंतच मर्यादित राहिलेले नाही, तर छत्रपती संभाजीनगरातील तरुणाईही ड्रग्जच्या विळख्यात अडकली आहे. शहरात ड्रग्जचा पुरवठा करणारी मोठी साखळी आहे. दर्जावर ड्रग्जची किंमत ठरते. इंजेक्शनमधून घेण्यात येणारे ड्रग्ज २,५०० ते ५ हजार रुपयांत मिळते. तरुण ३ हजार रुपयांच्या इंजेक्शन ड्रग्जच्या सर्वाधिक नादी लागले आहेत.
पुणे येथील ड्रग्जचे प्रकरण आणि २६ जून रोजी पाळण्यात येणाऱ्या जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ‘लोकमत’ने ड्रग्जच्या व्यसनाला बळी पडलेल्या तरुणांशी संवाद साधला. हा संवाद साधताना तज्ज्ञांचीही उपस्थिती होती. गांजा, मद्य असे व्यसन केल्यानंतर वास येतो. मात्र, ड्रग्ज घेतल्यानंतर वास येत नाही. शिवाय नशा बराच वेळ राहते. त्यामुळे तरुणाई या ड्रग्जच्या आहारी जात आहे.
ड्रग्जचे व्यसन लागलेला तरुण काय म्हणाला?
प्रश्न : तू कशाची नशा करतोस? सवय कशी लागली?तरुण : मी इंजेक्शनद्वारे घेणारे ड्रग्ज (ड्रग्जचे नाव सांगितले) घेतलेले आहे. कर्जामुळे ‘टेन्शन’ येत होते. अशातच मित्रामुळे पहिल्यांदा ड्रग्ज घेतले. त्यानंतर पुन्हा पुन्हा घेतले. मी आधी मुंबईत होतो. तेथे हे काॅमन आहे. मात्र, तेथे मी कधी घेतले नाही; पण छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर व्यसन लागले.
प्रश्न : ड्रग्ज घेतल्यावर किती वेळ नशा राहते?तरुण : ३ तास. ड्रग्ज घेतल्यानंतर फ्रेश वाटते; परंतु नंतर पश्चात्ताप होतो.
प्रश्न : हे ड्रग्ज कसे आणि कुठे मिळते?तरुण : ड्रग्ज देणाऱ्यांची मोठी साखळी आहे. मला एका मित्राकडून मिळाले. मित्राला दुसऱ्याकडून आणि दुसऱ्याला तिसऱ्याकडून मिळाले. अशी लांब साखळी आहे. शहरातच हे ड्रग्ज मिळते.
प्रश्न : ड्रग्जची किंमत किती?तरुण : या ड्रग्जची किंमत २,५०० ते ५ हजार रुपये आहे. क्वालिटीनुसार किंमत ठरते. मी ३ हजार रुपये किमतीचे घेतले. ३ हजारांच्या ड्रग्जमध्ये तीन वेळा नशा करता येते.
प्रश्न : पैसे कुठून आणतोस?तरुण : मित्र, परिवाराकडून कसेबसे पैसे जमा केले.
प्रश्न : यापुढेही ड्रग्ज घेणार आहे का?तरुण : ड्रग्जमुळे काय नुकसान होते, हे जाणवले. त्यामुळे यापुढे ड्रग्ज घेणार नाही, असा निर्धार केला आहे.(या तरुणाचे व्यसन सुटण्यासाठी त्याच्यासोबत कायम एक व्यक्ती ठेवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे.)
गांजापासून सुरुवात ड्रग्जपर्यंतअन्य एका तरुणाशीही संवाद साधण्यात आला. गांजापासून व्यसनाची सवय लागली. त्यानंतर ड्रग्जची घेण्याची सवय लागली, असे तो म्हणाला. पण ड्रग्जविषयी अधिक माहिती विचारल्यावर तो गप्प बसला.
पालकांनो सतर्क रहा, मुले कुठे जातात, कोणासोबत राहतात?- मनोविकारतज्ज्ञ डॉ. अमोल देशमुख म्हणाले, गेल्या महिन्यात दारूव्यतिरिक्त गांजा , चरस, व्हाईटनरचे व्यसन करणारे बाह्यरुग्ण विभागात आले. आलेले बहुतांश रुग्ण तरुण वयोगटातील असतात. व्यसन कर म्हणणाऱ्या मित्राला नाही, म्हणायला शिकावे. अशा व्यसन करणाऱ्या समूहामध्ये सहभागी होणे टाळावे. आनंद मिळवण्याच्या स्वस्थ आणि सुदृढ पद्धतींचा अवलंब करावा. उदा. खेळ, कला, संगीत.- मनोविकारतज्ज्ञ डाॅ. मेराज कादरी म्हणाले, आई-वडिलांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या वर्तणुकीत काही बदल दिसला तर त्यांच्याशी संवाद साधावा. व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी आता शाळास्तरावरच शिक्षण देण्याची गरज आहे.