औरंगाबाद : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंगर्तत सातारा परिसरात टाकण्यात येणारी जलवाहिनी गुणवत्तेने परिपूर्ण असून, ती महानगरपालिकेच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही डॅमेज करून नळ कनेक्शन घेऊ शकणार नाही. त्यामुळे चोरून नळ घेण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे विविध आकाराच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू झालेले आहे. पाण्याची मागणी कोणत्या वसाहतीत जास्त आहे, लोकसंख्येनुसार ११० ते २०० एमएमची ही जलवाहिनी जमिनीत टाकण्यासाठी विशिष्ट पद्धतीने तंत्रज्ञान वापरले जात आहे. मुख्य जलवाहिनी व तिला जोडणाऱ्या उपवाहिन्यांचा आकार मागणी व गरजेनुसार वापरण्यात येत आहे.
असे आहे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान
हाय डेन्सिटी पॉलीथीलेन (एचडीपीई) या तंत्रज्ञानाने तयार केलेल्या या जलवाहिनीतून पाणी प्रवाहित नसेल तेव्हा ती काहीशी आकुंचन पावते, तर पाण्याच्या दाबाने ती मूळ आकारात येते. त्यातून पूर्ण दाबाने पाणी सोडणे शक्य आहे; शिवाय गंज लागणे, शेवाळणे या प्रकारांपासूनही ही जलवाहिनी खराब होणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जेसीबी व यंत्रसामग्रीने कामाचा वेग वाढविल्याने जीआय जलवाहिनी टाकण्यासाठी जो वेळ लागतो, त्या तुलनेत अत्यंत कमी वेळ या कामासाठी लागत आहे. मात्र लोखंडाऐवजी प्लास्टीकची ही जलवाहिनी किती दिवस टिकेल, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
शंभर वर्षांचे लाइफ...
याच जलवाहिनीचे प्रोजेक्ट उदगिर, चंद्रपूर, पुणे इत्यादी ठिकाणी वापरलेले असून, ते बेस्ट प्रोजेक्ट ठरलेले आहेत. त्याच धर्तीवर सातारा-देवळाई व शहरातील हा प्रोजेक्ट आहे. जीआय आणि विविध आकारांत एचडीपीई पाइपची हाय डेन्सिटी असलेली जोडणी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. या जलवाहिनीचे आयुष्य किमान शंभर वर्षे राहणार आहे.
- अभियंता सुनील नाईकवाडे (साईट अभियंता)
कॅप्शन...
साताऱ्यात महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाच्या वतीने टाकण्यात येत असलेली जलवाहिनी.