औरंगाबाद : रेल्वेस्टेशन परिसरात अत्याधुनिक शहर बसस्थानक उभारण्यात येणार आहे. प्रवासी पर्यटकांना आकर्षित करून त्यांना दर्जेदार सोयी-सुविधा पुरविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्याधुनिक बसस्थानकाच्या विकासासाठी स्मार्ट सिटीकडून निविदा काढण्यात आली आहे.
मनपाचे प्रशासक तथा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन लिमिटेडचे (एएससीडीसीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अत्याधुनिक बसस्थानक विकासासाठी कंत्राटदाराकडून निविदा मागविल्या आहेत. अत्याधुनिक बसस्थानक स्मार्ट सिटी बससेवेला पुरक ठरणार आहे. एएसडीसीएलच्या बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक प्रशांत भुसारी म्हणाले की, रेल्वेस्थानकांच्या मुख्य प्रवेशद्वार आणि एक्झिट गेटदरम्यान उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक बसस्थानकात केवळ बसगाड्यांनाच प्रवेश असणार आहे. इतर वाहनांना या परिसरात प्रवेशबंदी असणार आहे. बस नियंत्रणासाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. प्रवाशांसाठी पास काऊंटर, तक्रार निवारण कक्ष, सूचना व अभिप्राय केंद्र तसेच ऑडियो माध्यमातून बसेससंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. अत्याधुनिकरणात भिंतीचे बांधकाम, रंगरंगोटी, विविध कलाकृती, लँडस्केपींग तसेच रोषणाईंचा समावेश असणार आहे.
इतर वाहनांना प्रवेशबंदी
अत्याधुनिक बसस्थानकाच्या प्रवेशास आरएफआयडी तंत्रज्ञानाने सुसज्ज स्वयंचलित बूम अडथळे बसविण्यात येणार आहे. याद्वारे केवळ स्मार्ट सिटीबस आतमध्ये प्रवेश करेल. दुचाकी, चारचाकी, रिक्षांना या परिसरात प्रवेशबंदी असणार आहे. रेल्वेस्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी, पर्यटकांना अत्याधुनिक बसस्थानक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत यापूर्वी रेल्वेस्थानक परिसरात तीन बसथांबे, दोन मेगा डिजिटल आऊटडोर डिस्प्ले आणि सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.