वाळूज महानगर : व्यायामशाळा मोडकळीस आल्याने मल्लांना जीव धोक्यात घालून कुस्तीचा सराव करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेवून स्थानिक ग्रामपंचायतीने नवीन व्यायामशाळा उभारणीचे काम हाती घेतले आहे. व्यायाम शाळेचे काम प्रगती पथावर असून, लवकरच याचे काम पूर्णत्वाकडे जाणार आहे.
मिनी कोल्हापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीसगावला कुस्तीची उज्ज्वल परंपरा आहे. येथील मल्लांनी गुणवत्ता व डाव-पेच कौशल्याच्या जोरावर गाव ते देश पातळीवर कुस्त्यांचे फड गाजविले आहेत. रामचंद्र सूर्यवंशी, पर्वत कसुरे सिकंदर तरैय्यावाले, तुकाराम चोपडे, कन्हैयालाल सूर्यवंशी, अस्लम शेख, कडूबा चोपडे, रायभान शेलार आदी मल्लांनी राज्य पातळीवर यश मिळवून गावाचा नावलौकिक वाढविला आहे.
या कामगिरीमुळे पर्वत कसुरे यांना छत्रपती पुरस्काराने सन्मानित केले आहे. कुस्तीकडे तरुणाचा असलेला ओढा व आवड पाहून शासनाने मल्लांसाठी गावात व्यायाम शाळा बांधून दिली.
मल्लाना सराव करण्यासाठी लाल मातीचा आखाडा केला. परंतू दरम्यानच्या काळात ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने व्यायाम शाळा मोडकळीस आली. भिंती जीर्ण झाल्याने कोणत्याही क्षणी भिंती कोसळण्याची भिती व्यक्त केली होती.
व्यायाम शाळेची अवस्था पाहून प्रतिष्ठित नागरिक व मल्लांनी व्यायामशाळा दुरुस्तीची मागणी केली. नागरिकांची मागणी व मल्लांच्या भावना लक्षात घेवून ग्रामपंचायतीने जुनी व्यायाम शाळा पाडून नवीन उभारण्याचा निर्णय घेतला.
व्यायामशाळेसाठी स्वतंत्र २५ लाखांचा निधी मंजूर करुन कामाला सुरुवात केली. व्यायामशाळा इमारतीची पायाभरणी करुन कॉलम उभारले असून, काम प्रगती पथावर सुरु आहे. लवकरच व्यायामशाळेची सुसज्ज इमारत उभी रहाणार असल्याने गावातील मल्लांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.