औरंगाबाद : दोन दिवसांवर आलेली राज्य नाट्य स्पर्धा अचानक पुढे ढकलन्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून तयारी करणाऱ्या कलावंतानी या निर्णयामुळे संताप व्यक्त केला आहे. यानंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विभागीय कार्यालयासमोर कलावंतांनी हातात फलक धरत सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच सहभागी सर्व कलावंतानी गाणी गाऊन शासनाचा निषेध केला.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ६० वी राज्य मराठी नाट्य स्पर्धा पुढे ढकलली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने राज्यात १५ जानेवारीपासून १९ ठिकाणी राज्य नाट्य प्राथमिक स्पर्धा सुरू होणार होती. त्यात मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर या चार ठिकाणचा समावेश होता. मात्र, नमनालाच कोरोनाचे विघ्न आले.
स्पर्धा पुढे ढकलल्याचे कळताच काही कलाकारांनी थेट स्टेशन रोडवरील संचालनालयाचे विभागीय कार्यालय गाठले. स्पर्धेची पुढील तारीख जाहीर करा नसता २५ हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्या, अशी मागणी करत सरकारचा निषेध केला. त्यानंतर कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले.कोरोनाचे सावट दूर झाल्यावर नवीन तारीख जाहीर करणार येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहायक संचालक श्रीराम पांडे यांनी दिली आहे.