औरंगाबाद : एप्रिल २०२० मध्ये प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली होती. बुधवारी १८ डिसेंबर रोजी प्रभाग आरक्षणाची सोडतही निश्चित झाली होती. आज दुपारी अचानक राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीला स्थगिती दिली. त्यामुळे महापालिका निवडणूक जुन्या वॉर्ड पद्धतीनेच घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. आयोगाने घेतलेल्या आजच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या गोटात आनंदाची लाट पसरली आहे.
प्रभाग निवडणुकीत आजपर्यंत भाजपला चांगलाच फायदा झाला आहे. त्यादृष्टीने औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने घ्यावी, असा भाजपचा आग्रह होता. तत्कालीन भाजप सरकारने त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाला सूचना दिल्या होत्या. मागील काही दिवसांपासून राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेनुसार मनपाकडून प्रारूप आराखडा तयार करून घेतला. १८ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात प्रभाग आरक्षणासंदर्भात सोडतही आयोजित करण्यात आली होती.
राज्यातील महाआघाडीच्या सरकार स्थापनेनंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी महापालिका निवडणूक पूर्वीप्रमाणेच म्हणजेच वॉर्ड पद्धतीने घ्यावी, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला होता. आज दुपारी अचानक महापालिकेला राज्य निवडणूक आयोगाकडून एक पत्र प्राप्त झाले. १८ डिसेंबर रोजी प्रभाग रचनेच्या आरक्षणासाठी काढण्यात येणारी सोडत पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहे. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हे पत्र आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना पाठविले आहे.
शिवसेनेच्या गोटात आनंदशहरात ११५ वॉर्ड आहेत. २०१५ मध्ये मनपा निवडणुकीत सेनेने स्वबळावर २९ उमेदवार निवडून आणले होते. भाजपचे २३ उमेदवार निवडून आले होते. शिवसेनेने महाआघाडी स्थापन केली आहे. आगामी मनपा निवडणूकही महाआघाडीनुसारच होणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मनपात सत्ता स्थापन करण्याचा मनसुबा सेनेचा आहे.
भाजप बॅकफूटवरमागील काही दिवसांपासून भाजपने महापालिकेत शिवसेनेची चारही बाजूने कोंडी करणे सुरू केले आहे. १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला सरकारने स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ सर्व भाजप नगरसेवकांनी पक्षाकडे राजीनामे सादर केले आहेत. प्रभाग निवडणुकीच्या प्रक्रियेतही भाजपने आपली सोय करून घेतल्याचे बोलले जात होते. त्यावर आज शिवसेनेने पाणी फेरण्याचे काम केले.
सर्वत्र एकच पद्धत हवीराज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्यात आल्या आहेत. औरंगाबादेतही प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली होती. आता पुन्हा वॉर्ड पद्धतीकडे जाणे चुकीचे आहे. भाजपला यामुळे काही फरक पडणार नाही. अंतिम निर्णय मुख्यमंत्री, राज्य निवडणूक आयोगाला घ्यावा लागणार आहे. -अतुल सावे, आमदार, भाजप
आम्हाला निवडणूक सोपी; पद्धत कोणतीही चालेलशिवसेनेला प्रभाग निवडणुकीचा फारसा त्रास नव्हता. आमच्यासाठी निवडणूक महत्त्वाची असते. आमचे नगरसेवक, कार्यकर्ते सदैव जनतेच्या संपर्कात, सेवेत असतात. त्यामुळे निवडणूक सोपी आहे. वॉर्ड पद्धतही आम्हाला चालेल. मी अद्याप राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय बघितला नाही. उद्या बघणार आहे. - प्रदीप जैस्वाल, आमदार, शिवसेना
...तर सेनेची कोंडी प्रभाग पद्धती शिवसेनेला अवघड गेली असती. काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन त्यांना निवडणूक लढवावी लागेल. तिन्ही पक्षांचे चिन्ह वेगळे आहेत. त्यामुळे त्यांची कोंडी झाली असती. एमआयएमला प्रभाग, वॉर्ड कोणतीही पद्धत चालेल.- शेख अहेमद, जिल्हाध्यक्ष, एमआयएम.