औरंगाबाद : निवडणुकीच्या तोंडावर गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या प्रस्तावित दौलताबाद - चाळीसगाव रेल्वे मार्ग आणि रोटेगाव - कोपरगाव रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून ५० टक्के खर्च करण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी एका पत्राद्वारे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे दर्शविली आहे.
मराठवाड्यातील लातूर रोड ते गुलबर्गा हा रेल्वे मार्ग जोडण्यासाठी राज्याचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मागणी केली आहे. या मागणीनूसार लातूर रोड ते गुलबर्गा जोडल्यास प्रवासाचे अंतर कमी होईल. मराठवाड्यातील औरंगाबाद (दौलताबाद)- चाळीगाव रेल्वे मार्ग तयार झाल्यास औरंगाबाद रेल्वे मार्गावरील उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे तीन ते चार तास वाचणार आहेत. तसेच शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांसाठी तसेच दक्षिण भारतात थेट गोवा येथे जाण्यासाठी रोटेगाव-कोपरगाव हा प्रस्तावित रेल्वे मार्ग फायदेशीर ठरणारा आहे
या दोन्ही रेल्वे मागार्चे सर्वेक्षण झाले आहे. परंतु प्रत्यक्षात पुढे काहीही हालचाली होत नसल्याने दोन्ही रेल्वे मार्ग रखडले आहेत. या मार्गांबाबत मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर, प्रल्हाद पारटकर, संतोष भाटिया, चंद्रकांत मेणे, वर्धमान जैन यांनी पीएमओ कार्यालयाकडे विचारणा केली होती. सदर मार्ग रद्द झाल्याचे उत्तर बोरकर यांना देण्यात आले होते. यानंतर या मार्गांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनीही पाठपुरावाही केला होता.
प्रश्न सुटण्याची शक्यताया सगळ्याचा परिणाम म्हणून मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद - चाळीसगाव आणि रोटेगाव - कोपरगाव या दोन मार्गाशिवाय लातूररोड ते गुलबर्गा या नविन रेल्वेमार्गाची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली. यासाठी महाराष्ट्र शासन ५० टक्के निधी उपलब्ध करुन देईल ,असे पत्रात नमुद करण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्यातील रखडलेल्या या दोन्ही रेल्वे मार्गांचा प्रश्न सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.