छत्रपती संभाजीनगर: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सनदशीर मार्गाने मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकावर शुक्रवारी रात्री पोलिसांनी अमानुष लाठी हल्ला केला. या घटनेत शेकडो आंदोलक जखमी झाले. या घटनेचा सर्वत्र निषेध होऊ लागला आहे. छत्रपती संभाजी नगर शहरातील मुकुंदवाडी येथील सर्वपक्षीय मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी काही काळ जालना रोड वर रस्ता रोको केला. ही बाब पोलिसांच्या निदर्शने येताच त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा, लाख मराठा ,राज्य सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वरपाय, आदी घोषणा आंदोलक देत होते. या आंदोलनात शिवसेना युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी हनुमंत शिंदे, अमर जगताप, बाबासाहेब डांगे, भाऊसाहेब जगताप, कमलाकर जगताप, किशोर ठुबे, संजय जगताप, पांडुरंग साळुंखे, सचिन साळुंखे, बाळू लोढे, अजय गांधी, आणि संतोष शेंगोळे आदींनी सहभाग घेतला.