लातूर : लहुजी शक्ती सेना व मानवी हक्क अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ५ फेब्रुवारी रोजी लातुरात तिसरे राज्यस्तरीय सत्यशोधिका मुक्ता साळवे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलन अध्यक्षपदी लेखिका प्रा. प्रतिमा परदेशी (पुणे) यांची, स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. रमेश पारवे यांची व कार्यवाह म्हणून दयानंद कांबळे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संयोजक प्राचार्य डॉ. माधव गादेकर यांनी शनिवारी दिली.शहरातील डॉ. भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात आयोजित संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश राक्षे (पुणे), लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश अध्यक्ष सोमनाथभाऊ कांबळे यांची उपस्थिती राहणार आहे. संमेलनात प्रा. डॉ. श्रीराम गुंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्रोही मुक्ता साळवे व आजची महिला या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात मानवी हक्क अभियानाच्या महिला प्रमुख मनीषा तोकले, डॉ. विजयकुमार कुमठेकर, उत्तम दोरवे, सिद्धार्थ भालेराव हे सहभागी होणार आहेत़ कवी प्रा. फ. म. शहाजिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. संमेलनाचा समारोप प्रा. प्रतिमा परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष किशोर ढमाले, ज्येष्ठ सत्यशोधक अभ्यासक प्रा. जी. ए. उगले, मानवी हक्क अभियानाचे प्रदेश उपाध्यक्ष बी.पी. सुर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र भुले आदींची उपस्थिती राहणार आहे. या संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
लातुरात राज्यस्तरीय मुक्ता साळवे साहित्य संमेलन
By admin | Published: January 28, 2017 11:41 PM