छत्रपती संभाजीनगर : पेरियार ई. व्ही. रामासामी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लढे आणि विचारांमध्ये अनेक साम्य आहे. समाजातील दांभिकता, अस्पृश्यता तसेच अंधश्रद्धेवर कडाडून प्रहार करणारे तामिळनाडूतील विचारवंत पेरियार यांचा राज्यातील पहिल्या पुतळ्याचे लोकार्पण १ सप्टेंबर रोजी वाळूज परिसरातील महाराष्ट्र महाविद्यालयात केले जाणार आहे.
यासंदर्भात पत्रकार परिषदेत मानव विकास व पुनर्निमाण संशोधन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य सुनील वाकेकर व पेरियार अभ्यासक भीमराव सरवदे यांनी सांगितले की, तामिळनाडू राज्यात आजपर्यंत पेरियार विचाराचेच सरकार सत्तेत आहे. डॉ. आंबेडकरांना हिंदू महिलांना हक्क देणारे हिंदू कोड बिल, धम्मचक्र प्रवर्तन, मनुस्मृती दहन अशा अनेक समाजपरिवर्तनाच्या लढ्यांना पेरियार यांचा पाठिंबा होता. अशा या परिवर्तनवादी समाजसुधारकाचा अभ्यासक्रमात समावेश करावा, यासाठी आम्ही लढा उभारणार आहोत. येणाऱ्या भावी पिढीला पेरियार यांचा विचार प्रेरणादायी ठरेल, यासाठी महाराष्ट्र महाविद्यालयात त्यांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले जात आहे.
तामिळनाडूचे खा. थोल थिरुमावल्लवण यांच्या हस्ते १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता या पुतळ्याचे लोकार्पण होईल. यावेळी उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय शोषित समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामीप्रसाद मौर्य, आम आदमी पार्टीचे मंत्री राजेंद्र पाल गौतम आणि बिहार येथील विरोधी पक्षनेता तेजस्वी यादव हे विशेष अतिथी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, बीआरएसपीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश माने, बामसेफचे राष्ट्रीय संघटन सचिव संजय मोहिते, ओबीसी विचारवंत श्रावण देवरे, बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे, आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे गणेश्वर, प्रा. प्रकाश सिरसट, राज राजापूरकर, भीमराव सरवदे, पार्थ पोळके, अनिलकुमार बस्ते, अमोल नरवडे, पांडुरंग तायडे पाटील आणि राहुल अन्वीकर हे उपस्थित राहाणार आहेत.