औरंगाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन करून पळून गेलेल्या एका वाहनचालकाविरूद्ध सेफ सिटीकडून आलेल्या समन्सची अंमलबजावणी करण्यासाठी दलालवाडीमध्ये गेलेल्या पोलीस हवालदाराला एका जणाने शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना २९ आॅक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली.
याविषयी क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांचे छायाचित्रे सीसीटिव्ही कॅमे-यामार्फत घेऊन वाहनचालकांना दंडाची नोटीस पाठविण्याचे काम पोलीस आयुक्तालयातील सेफ सिटीकडून केले जाते. सेफ सिटीकडून सुनील बद्रीनाथ चावरिया (रा.दलालवाडी) याच्या नावे असलेली नोटीस घेऊन पोलीस हेडकाँन्स्टेबल बेग आणि नाईक लक्ष्मीकांत बनसोड हे आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दलालवाडीत गेले. तेथे त्यांनी त्यांची मोटारसायकल उभी करून ते रस्त्यावरील लोकांना सुनील चावरिया कोठे राहतो,अशी विचारपूस करू लागले.
त्याचवेळी एक २५ ते ३० वयाचा धडधाकट अनोळखी तरूण त्यांच्या दिशेने आला आणि सुनीलची नोटीस घेऊन तुम्ही आमच्या गल्लीत कसे काय आला, असे म्हणाला. यावेळी तु सुनील आहे का असे पोलिसांनी त्यास विचारताच त्याने रस्त्यावरील दगड उचलला आणि बनसोड यांना फेकून मारला. हा दगड बनसोड यांच्या पायाला लागल्याने ते जखमी झाले. यावेळी पोहेकाँ बेग हे त्यास पकडण्यासाठी धावले असता यापुढे येथे आला तर जिवंत सोडणार नाही,अशी धमकी देऊन तो तेथून पळून गेला. या घटनेनंतर बनसोड यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरूद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी कर्मचा-यास मारहाण करणे, धमकी देणे आदी कलमाखाली गुन्ह्याची नोंद करून आरोपीचा शोध सुरू केला.