औरंगाबाद : आमखास मैदानाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात महाकवी वामनदादा कर्डक यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यास प्रशासनाने मंजुरी दिली. याकामासाठी ३० लाख ९३ हजार रुपये खर्च होणार आहे. निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोककवी वामनदादा कर्डक यांनी आयुष्याची ७० वर्षे आपल्या बुलंद, क्रांतिकारी लेखणीच्या आणि गीतांच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांचे विचार सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत पोहोचविले. वामनदादा हे स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांच्या कार्याची व थोर विचारांची जनतेला जाणीव व्हावी व प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
नागरिकांनी सुद्धा पुतळा बसविण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. पूर्णाकृती पुतळ्यासाठी १८ लाख ३६ हजार आणि स्थापत्य कामासाठी १२ लाख ५७ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या एकूण ३० लाख ९३ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मान्यता दिली. . वामनदादा यांचा पुतळा बसविण्याबाबत महापालिकेने १६ ऑक्टोबर २०१९ रोजीच्या सभेत ठराव मंजूर केला होता. मात्र, पुढे काही दिवस या ठरावाच्या अनुषंगाने कार्यवाही झाली नव्हती. आता प्रशासकांनी त्याचे अंदाजपत्रक तयार करून मान्यतेसाठी सादर केले होते.