उस्मानाबाद : अभ्यासक्रमाबाहेरील शिक्षणामध्ये विद्यार्थी घडविण्याची शक्ती असते. विद्यार्थी कधीही नापास अथवा ढकलपास होत नसतात. तर विद्यार्थ्यांतील क्षमता लक्षात न घेता सुरू असलेली शिक्षणव्यवस्था नापास होत असते. ‘मी’पणा नाकारणे म्हणजे खऱ्या अर्थाने शैक्षणिक मूल्यांची रूजवणूक होय. जेथे ‘सेल्फ’ आणि ‘सेल्फी’ असे मीपणाचे विचार सुरू होतात, तेथूनच विकृतीला सुरूवात होत असते. त्यामुळे ‘सेल्फी’पासून शिक्षण संस्कृतीने दूर रहायला हवे’, अशा शब्दात कवी इंद्रजित भालेराव यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला फटकारले.अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे व उस्मानाबाद जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील छायादिप मंगल कार्यालय येथे आयोजित तीन दिवशीय राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाचे रविवारी सायंकाळी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर संमेलनाध्यक्ष एम. डी. देशमुख, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. सुजितसिंह ठाकूर, शिक्षण संचालक नामदेव जरग, उषाताई देशमुख, माजी संमेलनाध्यक्ष कवडूजी वेलथरे, शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे, सचिन जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.कवी भालेराव म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची असते. आपल्या व्यक्तिगत जीवनातही शिक्षकांमुळेच आमूलाग्र बदल झाला असल्याचेही भालेराव यांनी नमूद केले. शालेय शिक्षण घेत असताना भगवद्गीतेसह हजारो ओव्या तोंडपाठ होत्या. असे असतानाही आपल्यासारख्या विद्यार्थ्याला चौथी, सातवी आणि दहावीच्या परीक्षेत नापास व्हावे लागले. याचा अर्थ शिक्षणव्यवस्थेने विद्यार्थ्यांतील क्षमतेनुसार बदल करून घ्यायला हवेत, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी ‘कुलस्वामिनी’ या स्मरणिकेचेही प्रकाशन झाले. कार्यक्रमास राज्यभरातील दोन हजाराहून अधिक मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र केसकर यांनी केले. आभार मुख्याध्यापक संघाचे डी. डी. शेरे यांनी मानले. (प्रतिनिधी)
‘सेल्फी’पासून शिक्षण संस्कृतीने दूर राहावे
By admin | Published: November 07, 2016 12:43 AM