गंगापूर (औरंगाबाद ) : आजकाल नातेसंबंध केवळ औपचारिकतेपुरते मानले जात आहेत. स्वार्थाभोवतीच कारभार हाकणाऱ्यांची नाती केवळ अर्थापुरतीच मर्यादित राहत असताना सावत्र बापाने माहेरी नेण्याच्या बहाण्याने अर्ध्यात सोडून दिलेल्या भोळसर विवाहित मुलीला अमोल साळवे या अनोळखी तरुणाने पोलिसांच्या मदतीने घरपोच तिची पाठवणी केली आणि या ताईला अनमोल भाऊबीज भेट दिली.
जालना हे माहेर तर भटाना (ता.वैजापूर) हे सासर असलेल्या रेखा जगन्नाथ दुधाने (२५)चा स्वभाव तसा भोळसर. त्यात बोलणे ही अडखळत होते. रेखाच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर आईने दुसरे लग्न केले. रेखाच्या भोळसरपणामुळे तिची आतापर्यंत दोन लग्न झाली. आईने सावत्र बापाच्या मदतीने दुसऱ्यांदा तिला भटाना येथे नांदायला पाठवले. या दिवाळीत भाऊबीजेकरिता माहेरी घेऊन जाण्यासाठी सावत्र बाप तिला भटाणा येथून घेऊन निघाला. मात्र, गंगापूर जवळ येताच त्याने तिला सोडून पळ काढला. अनोळखी शहरात भोळसर स्वभावाची रेखा कावरीबावरी झाली. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात बसून ती ढसाढसा रडायला लागली. तेव्हा रवींद्र नारळे यांनी तिला धीर दिला. विचारपूस केली, तर तिला काहीच सांगता येत नव्हते.
बाजार समितीपासून काही अंतरावर राहणाऱ्या अमोल साळवे यांच्या घरी घेऊन गेला, अमोल व त्यांच्या घरातील मंडळींनी तिला धीर देत खायला दिले. विश्वासात घेऊन विचारपूस केली. रडत रडत रेखाने आपबीती सांगितली. तेव्हा अमोल यांनी जालना पोलिसांना संपर्क केला. पो.नि. अनिरुद्ध नांदेडकर यांना सदरील घटना कळवली. अमोल यांनी रेखाला साडीचोळी देऊन येथील पोलीस ठाण्यात आणले. पो.नि. संजय लोहकरे यांनी महिला पोलीस स्वाती गायकवाड व पोकॉ. जी.टी. सदगीर यांना पाठविण्यासाठी सोबत दिले. अमोल साळवे यांनी खासगी वाहन करून रेखा यांना स्वखर्चाने गंगापूर व जालना पोलिसांच्या मदतीने घरी सुखरूप पोहोच केले.
एकीकडे रक्ताची नाती तकलादूएकीकडे सख्ख्या बहीण-भावांची रक्ताची नाती तकलादू होत असताना अमोल साळवे हा तरुण अनोळखी महिलेचा भाऊ झाला. तिला स्वखर्चाने सुखरूप घरी पोहोचविले. समाजासमोर एक आदर्श उभा करून अमोलने खऱ्या अर्थाने अनोखी भाऊबीज साजरी केली.
हात जोडत तिने सर्वांचा निरोप घेतला..प्रकरण महिलेचे असल्याने अमोल साळवे याने रेखाला परस्पर न पाठवता पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले. अमोल रेखाला घेऊन ठाण्यात आला असता रेखा पोलिसांना पाहून घाबरली. जोरजोरात रडायला लागली. तेव्हा रेखाची समजूत काढून तिला शांत करण्यात आले. घराकडे जाण्यास गाडीत बसताना रेखाला अश्रू आवरत नव्हते. पाणावलेल्या डोळ्यांनी न विसरता अमोलच्या पाया पडत सर्वांना हात जोडून रेखाने उपस्थितांचा निरोप घेतला.