औरंगाबाद : शहरातील कोणत्या ना कोणत्या भागात दररोज गुंगीकारक औषधींचा साठा पकडण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळीही सिटी चौक पोलिसांनी १२० आणि एनडीपीएस सेलने २० बाटल्या जप्त केल्या. हे विकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत असताना त्यांना पुरवठा करणारे मात्र मोकाटच आहेत.
सिटी चौकचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांना राहत कॉलनी ते जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरील भिकन शहा दर्गा भागात दोनजण गुंगीवर्धक औषधी बाटल्यांच्या विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली. विशेष पथकाचे उपनिरीक्षक राेहित गांगुर्डे यांच्या पथकास सापळा लावण्याचे आदेश त्यांनी दिले. त्या ठिकाणी मोपेडवर दोनजण आल्यानंतर त्यांना पकडून अंगझडतीसह दुचाकीची डिकी तपासली, तेव्हा त्यांच्या दुचाकीत १२ हजार ८४० रुपये किमतीच्या तब्बल १२० औषधी बाटल्यांसह हत्यार आढळले.
या कारवाईत शेख जावेद शेख कलीम (रा. शहाबाजार, निशानजवळ) आणि मोहम्मद फैसल मोहम्मद अय्याज (रा. रोशन गेट, बारी कॉलनी) या दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून औषधीसह ९५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांच्या विरोधात उपनिरीक्षक गांगुर्डे यांच्या तक्रारीवरून एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. अधिक तपास दुय्यम निरीक्षक अशोक भंडारे करीत आहेत. ही कामगिरी निरीक्षक अशोक गिरी, भंडारे यांच्या मार्गदर्शनात फौजदार गांगुर्डे, औषधी निरीक्षक अंजली मिटकर, हवालदार मुनीर पठाण, विलास काळे, शाहीद पटेल, ओमप्रकाश बनकर, शेख अब्दुल गफ्फार, देशराज मोरे, साेहेल पठाण, अभिजित गायकवाड, बबन इप्पर यांनी केली.
एनडीपीएसने ६३ हजारांचा मुद्देमाल पकडलाएनडीपीएसच्या पथकाचे सहायक निरीक्षक सय्यद मोहसीन अली यांना रवींद्रनगर भागात माजेद खान चांद खान (रा. अशोकनगर, शहाबाजार) आणि शेख अकबर शेख पाशा (रा.अशोकनगर) यांच्याकडे गुंगीकारक औषधाचा साठा असल्याची माहिती मिळाली. छापा मारल्यानंतर त्यांच्याकडे २० गुंगीकारक औषधीच्या बाटल्या सापडल्या. त्याशिवाय रोख रक्कम, दुचाकी आणि मोबाइल असा ६३ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कामगिरी सपोनि सय्यद मोहसीन, सहायक फाैजदार नंदकुमार भंडारे, सय्यद शकील, प्रकाश गायकवाड, आनंद वाहूळ, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, प्राजक्ता वाघमारे यांनी केली.