वाळूज महानगर : घाणेगाव शिवारातील फाळके शेतवस्तीवर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरी करुन जवळपास ४३ हजारांचा ऐवज लांबविला आहे. या चोरीच्या घटनेमुळे शेतवस्तीवर वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबियात भितीचे वातावरण पसरले आहे.
सागर रमेश फाळके हे कुटुंबासह फाळके वस्तीवर कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सागर हे गुरुवारी कंपनीच्या कामकाजासाठी पैठण येथे गेले होते. सायंकाळी परतण्यास उशीर झाल्याने ते पैठणला मुक्कामी थांबले.
दरम्यान, शेतवस्तीवर जुन्या घरात सागर यांचे वडील रमेश, आई लक्ष्मीबाई व लहान भाऊ दत्ता हे तर नवीन घरात त्यांची पत्नी अश्विनी व दुसºया रुममध्ये भाऊ दत्ता झोपी गेले होते. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १२.३० ते १ वाजेच्या सुमारास अश्विनी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र कुणीतरी ओरबडल्यामुळे त्यांना जाग आली. त्यामुळे अश्विनी यांनी आरडा-ओरडा केल्याने चोरट्याने पळ काढला. चोरट्याने अश्विनी यांच्या गळ्यातील मंगळसूत्राची अर्धा तोळ्याची सोन लांबविली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी सागर फाळके यांच्या घरातून जवळपास ४३ हजारांचा ऐवज लांबविला. दरम्यान फाळके कुटुंबियांनी घरातील जवळपास ७५ ते ८० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी झाला असल्याचे सांगत या चोरट्याचे आनखी काही साथीदार असावेत असा अंदाज वर्तविला आहे. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर चोरट्याचा माग काढण्यााठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी श्वान पथकाचे मच्छिंद्र तनपुरे, एस.जी.मोरे, सी.एन.बागुल, किशोर वाघुले यांनी स्विटी या श्वानाच्या मदतीने चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला.