वाळूज महानगर : वाहने चोरी केल्यानंतर तोडफोड करून भंगारात स्पेअर पार्ट विक्री करणाऱ्या रॅकेटचा एमआयडीसी वाळूज पोलिसांनी छडा लावला आहे. वाळूज उद्योगनगरीतून पळविलेला हायवा धुळे जिल्ह्यात तोडफोड केलेल्या अवस्थेत सापडला असून याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली.
रामनाथ प्रभाकर उढाण (रा. बजाजनगर) यांचा हायवा ट्रक (एम.एच. २० डी.टी. ०२०३) हा मुंबई-नागपूर महामार्गावरील जैस्वाल लॉन्ससमोरून चोरट्याने ९ ऑगस्टला लांबविला होता. उढाण यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या तपासणीत कन्नड येथील पथकर नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरी झालेला हायवा धुळ्याकडे जाताना कैद झाला होता. धुळे जिल्ह्यात चोरी झालेली वाहने तोडफोड करून स्पेअर पार्ट भंगारात विक्री करणारे रॅकेट असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी धुळे पोलिसांशी संपर्क साधून उपनिरीक्षक राजेंद्र बांगर, उपनिरीक्षक राहुल निर्वळ, पोना. नवाब शेख, संदीप घागडे, संजय बनकर, सुरेश भिसे यांचे पथक धुळे जिल्ह्यात रवाना केले.
पोलीस पथकाने बुधवारी रात्री धुळे जिल्ह्यातील इंदूर रोडवरील एका दुकानात छापा मारला. तेव्हा चोरीला गेलेल्या हायवा ट्रकचे स्पेअर पार्ट कटिंग मशीनने वेगवेगळे करण्याचे काम सुरू होते. पोलीस पथकाने कुलदीपसिंग गुरवसिंग रंधवा (४८, रा. मोहाडी, जि. धुळे) व आफताबखॉन चाँदखान (२७, रा. जामचा मळा, चाळीसगाव रोड) या दोघांना ताब्यात घेतले.
चोरलेल्या वाहनाची तोडफोड करून भंगारात विक्री
धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणावरून चोरी केलेल्या वाहनांची तोडफोड करून या वाहनाचे इंजिन, चेसिज, टायर, बॉडी आदी स्पेअरपार्ट वेगवेगळे करून त्यांची भंगारात विक्री करणाऱ्या रॅकेटमधील कुलदीपदिंग रंधवा व आफताबखॉन या दोघांना पोलिसांनी पकडले. रामनाथ उढाण यांच्या चोरी झालेल्या हायवाचे स्पेअर पार्ट एका ट्रकमध्ये भरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आणले आहे. या दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
फोटो ओळ- वाळूज एमआयडीसीतून चोरी झालेल्या हायवाची धुळे येथे अशा प्रकारे कटिंग मशीनने स्पेअर पार्ट वेगवेगळे करण्याचे काम सुरू असताना पोलीस पथकाने छापा मारून दोघांना ताब्यात घेतले.
--------------------------