उस्मानाबाद : शोरूमच्या पाठिमागील बाजूस सोडण्यात आलेल्या टाकाऊ आॅईलच्या साठ्याला अचानक आग लागल्याची घटना शहरातील राजीव गांधी नगर भागात बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. यावेळी परिसरात मोठमोठे धुराचे लोट पसरल्यामुळे नागरिकांत एकच खळबळ उडाली. अग्नीशमन दलाच्या गाडीने तातडीने आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. शहरातील राजीव गांधी नगर येथे प्रतिभा मोटर्स हे शोरूम आहे. या शोरूमच्या पाठिमागील बाजूस वॉशिंग सेंटर असून, वाहनांची दुरूस्ती व सर्व्हिसिंग केल्यानंतर वापरलेले आॅईल शोरूमच्या पाठिमागे रस्त्याच्या कडेला सोडून देण्यात आले आहे. बुधवारी दुपारी या सोडण्यात आलेल्या आॅईलने अचानक पेट घेतला. भरवस्तीत ही घटना घडल्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. आगीचे रौद्ररूप पाहून नागरिकांनी तातडीने घरातील गॅस टाक्या सुरक्षित स्थळी हलविल्या. आगीमुळे परिसरात मोठमोठे धुराचे लोट पसरले होते. दरम्यान, घटनेची माहिती समजताच अग्नीशमन विभागाची गाडी देखील तातडीने दाखल झाली. या जवानांनी आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आॅईलमिश्रीत पाणी व रस्त्यावरील वाहने इतरत्र हलविण्याबाबत या भागातील नागरिकांनी यापूर्वीच प्रशासनाला निवेदने दिली आहेत. परंतु, याची दखल घेण्यात आली नसल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. घटना समजताच नगरसेवक रोहीत निंबाळकर हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन जेसीबी मागवून घेऊन आईलने भरलेला खड्डा बुजवून घेतला.
टाकाऊ आॅईलसाठ्याने घेतला पेट
By admin | Published: May 05, 2016 12:28 AM