पैठण (औरंगाबाद ) : गेल्या अनेक वर्षापासून नाथमंदिर ट्रस्टच्या जागेवर अनधिकृतरित्या कब्जा करून घरे बांधलेल्या १०० ते १५० अतिक्रमण धारकांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. आज सकाळी ही अतिक्रमण काढण्यास पथकाने सुरूवात करताच येथील नागरीकांनी दगडफेक करत जाळपोळ केली. तसेच काही महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने प्रशासनाला येथून माघार घ्यावी लागली.
येथील संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळ पैठण यांच्या तालुका पैठण शिवारातील नगर परिषद हद्दीतील जमिन सर्वे नं २३३ एकूण क्षेत्रफळ २ हेक्टर ८५ आर तसेच सर्वे नं.२३५ एकूण क्षेत्रफळ २ हेक्टर २९ आर व सर्वे नं.२३७ एकूण क्षेत्रफळ १ हेक्टर ९९ आर ही मिळकत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाची असून या जमिनीवर गेल्या २५ ते ३० वर्षापासून येथील नागरीकांनी अतिक्रमण करून अनाधिकृत घरे बांधल्याचा आरोप मंडळाने केला होता.हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट आहे.न्यायालयाने या अतिक्रमण धारकांच्या प्रकरणावर कोणताही निर्णय दिलेला नाही.
मात्र एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाच्या वतीने अतिक्रमण धारकांना दोन दिवसांपूर्वी नोटीसा देऊन आज सकाळी अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. अतिक्रमण विभागाचे पथक, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव व तहसीलदार महेश सावंत यांच्यासह पोलिस बंदोबस्त व दंगाकाबू पथक घटनास्थळी रवाना झाले. मात्र नागरीकांचे उग्ररूप पाहताच प्रशासनाने अतिक्रमण धारकांशी चर्चा करून तात्पुरती माघार घेतली आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्यासह पो नि चंदन इमले यांच्यासह ५० ते ६० पोलिस कर्मचारी उपस्थितीत होते. या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन एकच खळबळ उडाली.
अतिक्रमण धारकांनी केली जाळपोळ अतिक्रमण पथकाला नागरीकांनी तीव्र विरोध केला व अतिक्रमण पाडू नका अशी विनंतीही केली. मात्र, पोलिस बंंदोबस्तात आलेल्या अतिक्रमण पथक ऐकत नसल्याचे पाहून नागरिकांनी दगडफेक सुरू केली.या दगडफेकीत अग्नीशामक दलाच्या वाहनांच्या काचा फुटल्या यानंतर मोहिम थांबविण्यात आली.
महिलांचा आत्महत्येचा प्रयत्न अतिक्रमण काढण्यास विरोध करून काही अतिक्रमण धारक महिलांनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांचा प्रयत्न हाणून पाडला व त्यांना ताब्यात घेतले.