औरंगाबाद : कुख्यात गँगस्टर तथा सुपारी किलर इम्रान मेंहदी आणि मृत माजी नगरसेवक सलीम कुरेशी समर्थकांमध्ये आज सायंकाळी जिल्हा कोर्टाच्या आवारात जोरदार हाणामारी झाली. यात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर घाटी रुग्णालयातसुद्धा दोन्ही गट परत एकदा आमने - सामने आल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला.
माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्यासह अन्य हत्या सुपारी घेऊन करणारा कुख्यात गँगस्टर इम्रान मेंहदीसह त्याचे साथीदार मोक्कांतर्गत हर्सूल कारागृहात कैद आहेत. सलीम कुरेशी यांच्या खूनाचा खटला मोक्का न्यायालयातच सुरू आहे. या खटल्याची न्यायालयात आज तारीख असल्याने मेहंदीसह त्याच्या साथीदारांना जिल्हाकोर्टात आणण्यात आले होते. यावेळी सुनावणीसाठी मेंहदी गँग आणि मृत कुरेशी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्यात जुने वैमनस्य असल्याने ते ऐकमेकांना खुणावत होते. खटल्याची सुनावणी संपल्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्तात आरोपींना पोलिसांच्या गाडीमध्ये बसविले. यावेळी त्यांच्यामागोमाग कोर्टातून बाहेर आलेल्या दोन्ही गटाच्या लोकांमध्ये जोरदार हाणमारी सुरू झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीत पाच जण जखमी झाले. अचानक झालेल्या या घटनेमुळे पोलिसांची प्रचंड धावपळ उडाली. पोलिसांच्या वाहनांवरही दगड फेकण्यात आले यात गाडीचा आरसा फुटला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वेदांतनगर पोलीस आणि पोलीस नियंत्रण कक्षातील पोलिसांनी कोर्टात धाव घेतली. यावेळी पोलिसांचे संख्याबळ वाढल्याचे पाहताच दोन्ही गटाचे काही लोक गायब झाले. शेख सद्दाम उर्फ याबा शेख इमाम(३०,रा. युनूस कॉलनी)आणि महमंद खालेद सिद्दीकी(रा.आसेफिया कॉलनी) हे जखमी झाले असून त्यांना घाटीत दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मेंहदी आणि त्याच्या साथीदारांची रवानगी हर्सूल कारागृहात केली.