औरंगाबाद : भूखंडाच्या वादातून प्लंबरचा निर्घृण खून करून मृतदेहात दगड गोटे भरून मृतदेह दौलताबाद शिवारातील विहिरीत फेकल्याप्रकरणी आरोपी बबला ऊर्फ शेख वाजेद शेख असद, त्याचा भाऊ शेख अमजद शेख असद ऊर्फ मोहसीन, शेख कलीम ऊर्फ कल्लू शेख सलीम आणि सय्यद शहाबुद्दीन ऊर्फ शहाब सय्यद राशेद यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी बुधवारी दोषी ठरविले. यात गुन्हेगाराला न्यायालयाकडून काय शिक्षा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेख जब्बार शेख गफ्फार (३०, रा. हिलालनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, बिस्मिल्ला कॉलनीतील भूखंडाच्या मालकीहक्कावरून आरोपींचा जब्बारसोबत वाद झाला होता. हा भूखंड आपल्याला द्यावा. तुला दुसऱ्या ठिकाणी चांगला भूखंड देतो, असे आरोपी त्याला म्हणत. जब्बार मात्र तो भूखंड सोडायला तयार नव्हता. यातून बबला ऊर्फ शेख वाजेद, त्याचा भाऊ अमजद , शेख कलीम ऊर्फ कल्लू आणि सय्यद शहाबुद्दीन यांनी १६ मे २०१८ रोजीच्या रात्री रिक्षातून जब्बारचे अपहरण केले. यानंतर त्याला बेगमपुरा स्मशानभूमीजवळ त्यांनी जिवे मारून टाकले. यानंतर जब्बारचा मृतदेह घेऊन दौलताबाद परिसरातील मोमबत्ता तलावाजवळ घेऊन गेले. तेथे आरोपींनी जब्बारच्या पोटातील आतडे काढून दगडगोटे भरले. यानंतर मृतदेह बांधून विहिरीत टाकला. २० मे २०१८ रोजी विहिरीत मृतदेह आढळला होता.
जब्बारचे अपहरण करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना सांगितले होते. मृताचा भाऊ शेख सत्तार यांनी याविषयी बेगमपुरा ठाण्यात संशयितांविरुद्ध अपहरण आणि खुनाची तक्रार नोंदविली होती. याविषयी खुनाचा गुन्हा नोंदवून सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे आणि कर्मचाऱ्यांनी तपास करून सात संशयित आरोपींना अटक केली. आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंदवाडकर यांनी २१ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. फिर्यादीच्या वतीने अॅड. वर्षा घाणेकर-वाघचौरे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी शेख वाजेद ऊर्फ बबला, शेख अमजद ऊर्फ मोहसीन, शेख कलीम ऊर्फ कल्लू आणि सय्यद शहाबुद्दीन ऊर्फ शहाब यांना भारतीय दंडसंहितेच्या ३६४, ३६५, ३०२, २०१, ३४ कलमान्वये दोषी ठरविले. तर आरोपी प्रकरण निकालासाठी राखीव ठेवले आहे.माफीचा साक्षीदार इम्रानने कथन केली हत्येची घटना
या खटल्यातील माफीचा साक्षीदार शेख इम्रान ऊर्फ बाबा लोली शेख करीम याच्या डोळ्यासमोर संपूर्ण गुन्हा घडला होता. बबल्याने जब्बारवर कोयत्याने गंभीर वार केले आणि शेवटी फावड्याने मारून जब्बारला संपविले होते. त्यावेळी जब्बार हा मासळीसारखा तडफडत होता, अशी साक्ष इम्रानने न्यायालयात दिली होती. घटनास्थळालगत तबेला चालविणाऱ्या महिलेने जब्बारला सोडून देण्याची विनंती बबल्याकडे केली. मात्र त्याने तिला शिवीगाळ करून हाकलून दिले होते. दोन्हींची साक्ष प्रकरणात महत्त्वाची ठरली. माफीचा साक्षीदार शेख इम्रानला दोषी ठरविले जाणार की नाही, हे अंतिम निकालात स्पष्ट होईल.