वाळूज महानगर:गंगापूर-खुलताबाद विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार प्रा.सुरेश सोनवणे यांच्या दोन कारवर आज सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास धामोरी शिवारात अज्ञात इसमानी दगडफेक केल्याची घटना घडली. या दगडफेकीत प्रा.सोनवणे यांच्यासह अन्य दोघे जखमी झाले आहेत.
प्रचार दौरा आटोपून प्रा.सुरेश सोनवणे हे आपले सहकारी कार चालक सूरज मुंडे व नितीन सातपुते यांच्या सोबत धामोरी येथे मित्र डॉ. शेळके यांना भेटण्यासाठी गेले होते. रात्री 9 वाजेच्या सुमारास प्रा. सोनवणे हे धामोरीहून वाळूजच्या दिशेने घरी चालले होते. धामोरी पासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर कार मधून जात असताना रस्त्यावर उभे असलेल्या तिघांनी हात दाखविल्याने कार्यकर्ते असतील असा समज झाल्याने प्रा. सोनवणे यांनी कार चालक मुंढे यास कार थांबविण्यास सांगितले कार थांबताच कापसाच्या शेतात लपलेल्या अज्ञात इसमानी यांच्या कारवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत प्रा.सोनवणे यांच्या डोक्याय दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून कार मधील चालक सुरज मुंढे नितीन सातपुते हे किरकोळ जखमी झाले आहेत.
ही दगडकफेक सुरू असताना पाठीमागून येणाऱ्या सुरेश सोनवणे यांच्या दुसऱ्या कारवरही अज्ञात इसमानी दगडफेक केली. या दगडफेकीत कार मधील लक्षमण डोळस हे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच गंभीर जखमी सुरेश सोनवणे यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचारासाठी शिवराई पथकर नाक्याजवळील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलिस आयुक्त महेंद्र देशमुख,वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाणे, उपनिरीक्षक अजय शितोळे, एम वाळूजचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, पोका बाळासाहेब आंधळे, विक्रम वाघ, योगेश शेळके, बबलू थोरात आदींनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी करून घटनेची माहिती जाणून घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू पोलिसांनी असल्याचे सांगितले.