औरंगाबाद : शहरातील रिक्षाचालकांनी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच भाडे आकारावे. प्रवासी वाहतुकीदरम्यान नियमांचे पालन करावे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आरटीओ कार्यालयाने दिला आहे. रिक्षाचालक नियमाचा भंग करीत असल्याचे निदर्शानास आल्यास प्रवाशांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
शहरातील रस्त्यार एखादा प्रवासी उभा दिसला की मागच्या वाहनांचा विचार न करता अचानक रिक्षा थांबविली जाते. जालना रोड, रेल्वेस्टेशन, बसस्थानक, घाटी परिसर अशा विविध ठिकाणी प्रवाशांकडून मनमानी भाडे वसुल केले जाते. मिटरने जाण्यास नकार दिला जातो. याविषयी ‘लोकमत’ने २१ सप्टेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत आरटीओ कार्यालयाने कारवाईचा इशारा दिला आहे. रिक्षाचालकांनी आरटीओ कार्यालयातर्फे जारी करण्यात येणारे क्यूआर कोड स्टिकर्स रिक्षाच्या दर्शनी भागात लावावे, गणवेश परिधान करावे आणि मिटरप्रमाणे भाडे आकारणी करावी, अशी सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी केली आहे.
प्रवाशांनी सुरक्षेच्या दृष्टीने क्यूआर कोड स्टिकर्स असल्याची आणि रिक्षाचालक गणवेशात असल्याची खात्री करून रिक्षातून प्रवास करावा. रिक्षात बसल्यानंतर क्यूआर कोड स्टिकरचा मोबाईलमध्ये छायाचित्र काढून ठेवावा, असे आवाहनही प्रवाशांना करण्यात आले आहे.