छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत टिकणारे आरक्षण द्यावे, सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने शनिवारी शहरातील हर्सूल टी पॉइंट, मुकुंदवाडी आणि गजानन महाराज मंदिर चौकात रास्ता रोको करण्यात आला.
विविध घोषणा देत मुकुंदवाडी चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोकोला सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे आंदेालन तासभर सुरू होते. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवित रस्त्यावर ठिय्या दिला. डोक्यावर भगव्या टोप्या आणि गळ्यात भगवा गमछा तसेच हातात भगवे झेंडे आणि जरांगे यांच्या समर्थनाचे फलक घेत शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले.
माजी नगरसेवक मोतीलाल जगताप, भाऊसाहेब जगताप आणि बाबासाहेब डांगे यांनी सांगितले की, जरांगे यांच्या मोर्चाला वाशी येथे राज्य सरकारने अधिसूचना पत्र दिले होते. यानुसार सगेसोयऱ्यांचा कायदा केला जाईल आणि मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. मात्र, सरकारने दुसराच कायदा करून समाजाची फसवणूक केली. आम्हाला टिकणारे आरक्षण हवे आहे, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच असेल. यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
वाहने पर्यायी मार्गावर वळविल्याने वाहतूक कोंडी टळलीमराठा समाजाच्या रास्ता रोकोची पोलिसांना आधीच कल्पना होती. यामुळे पोलिसांनीही खबरदारी घेत चिकलठाण्याकडून शहराकडे येणारी वाहतूक धूत हॉस्पिटलमार्गे वळविली होती. तसेच सिडकोकडून चिकलठाण्याकडे जाणारी वाहनांचा मार्गे एस.टी.वर्कशॉपपासून चिकलठाणा एमआयडीसी मार्गे वळविल्याने वाहतूक कोंडी टळली होती. केवळ आंदोलनावेळी मुकुंदवाडी चौकात आलेल्या बसेस व अन्य काही वाहने रास्ता रोकोमुळे तासभर एकाच ठिकाणी खोळंबली.
हर्सूल टी पॉइंट जाममराठा समाजाच्या हर्सूल टी पाॅइंट येथे सकाळी ११ ते १२:३० पर्यंत जोरदार रास्ता रोको करण्यात आला. विविध घोषणा देत शेकडो मराठा बांधवांनी चौकात ठिय्या दिल्याने हर्सूल टी पॉइंटला वाहतूक ठप्प झाली होती. फुलंब्री तालुक्यातील समाजबांधव शिवरायांचा अश्वारूढ पुतळा घेऊन आंदोलनात सहभागी होते.
गजानन महाराज मंदिर चौकात ठिय्यागजानन महाराज मंदिर चौकात ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह आठ ते दहा कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. अर्धा तास आंदोलक रस्त्यावर बसून होते. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढत त्यांना बाजूला केले.