शेंद्रा : गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री तात्काळ बंद करण्यासाठी शेवगा येथील तरुणांनी व महिलांनी प्रभारी पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांना साकडे घातले, तसेच त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
औरंगाबाद तालुक्यातील शेवगा येथे अवैध दारू विक्री करणारी तीन ते चार दुकाने असून, त्यांच्याविरोधात तात्काळ कारवाई करावी व दारूविक्री बंद करावी, अशा मागणीचे निवेदन शुक्रवारी प्रभारी पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
गावातील तरुण व्यसनाकडे वळत असून, व्यसनामुळे गावातील किसन अंबादास कोरडे, सचिन कचरू काकडे, हिंमत रेखा राठोड, बाळू मांगीलाल राठोड, भाऊसाहेब किसन पडूळ या तरुणांनी आपले जीवन संपवल्याचे निवेदनात म्हटले आहे. कुटुंबाचे प्रमुख असल्याने त्यांचे वारसदार हातावर आले असून, जगण्यासाठी त्यांना झगडावे लागत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
अवैधरीत्या सुरू असलेली दारूविक्री बंद करावी, या मागणीसाठी शेवगा येथील तरुणांसह महिलांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. प्रभारी पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांच्याकडे कैफियत मांडली. त्यांना गावडे यांनी न्याय देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती तरुणांनी दिली.