चिंचोली लिंबाजी : पूर्णा नदीपात्रातून गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. महसूल विभाग व पिशोर पोलीस वाळू उपसा रोखण्यात अपयशी ठरत असल्याने वाळूमाफिया सुसाट सुटले आहेत. दिवसेंदिवस वाळूमाफियांची वाढत चाललेली मुजोरी पाहून दिगाव ग्रामस्थांनी तहसीलदारांना अवैध वाळू उपसा थांबविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून चिंचोली लिंबाजी परिसरातून गेलेल्या पूर्णा नदीपात्रातील दिगाव, खेडी, शेलगाव, वाकद, बरकतपूर, चिंचोली लिंबाजी, वाकी, नेवपूर या वाळूपट्ट्यांचा शासकीय लिलाव झालेला नाही. यामुळे वाळूतस्करांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेत पिशोर पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बेसुमार वाळू उपसा चालविला आहे. आर्थिक हितसंबंधामुळे महसूल व पोलीस विभाग याकडे कानाडोळा करून कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. यामुळे माफियांना रान मोकळे झाले आहे. वाळूमाफियांची मुजोरी वाढल्याने अंगणवाडी, घरकुल व इतर शासकीय कामांसाठी वाळू मिळत नसल्याने कामे रखडली आहेत. ग्रामस्थ नदीत वाळू भरण्यास गेल्यावर नदीकाठचे शेतकरी वाळू भरण्यास विरोध करतात. पैसे दिल्याशिवाय वाळू भरू दिली जात नाही. त्यामुळे नाईलाजाने सर्वसामान्य नागरिकांना तीन ते साडेतीन हजार रुपये मोजून वाळू विकत घ्यावी लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या आठही वाळूघाटांतून दररोज शेकडो ब्रास वाळू उपसा होत असताना संबंधित यंत्रणा मात्र अळी मिळी गुपचिळी भूमिका घेतल्याने सर्व काही आलबेल सुरू आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अवैध वाळू उपसा थांबवून वाळूचोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकट
कमाईमुळे अनेक पुढारी वाळूच्या धंद्यात
वाळूच्या धंद्यात मोठी कमाई होत असल्याने अनेक राजकीय पुढारी या धंद्यात सक्रिय झाले आहेत. रात्रभर नदीपात्रात वाळूचोरी करणाऱ्यांचे व रस्त्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांचे साम्राज्य दिसते. वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांच्या कर्णकर्कश आवाजामुळे ग्रामस्थांची अक्षरशः झोप उडाली आहे; परंतु रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या व महसूल प्रशासनाच्या भरारी पथकाच्या नजरेस ही वाहने आर्थिक चष्मा घातल्याने नजरेस पडत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.