छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटीच्या एका वर्कऑर्डवर जालना रोडवर दुभाजकात होर्डिंग उभारण्यासाठी खड्डा करण्यात आला होता. या खड्ड्याच्या बाजूला मातीचा ढिगारा असल्याचे गॅस टँकर चालक डाव्या बाजूने जात असताना अपघात झाला. या गंभीर घटनेला जबाबदार असलेल्या प्रो ॲक्टिव्ह कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोलावून जी. श्रीकांत यांनी त्यांचा यथेच्छ समाचार घेतला. कंपनीला तूर्त काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले. वाहतूक पोलिस, महापालिकेच्या एनओसीशिवाय होर्डिंग उभारता येणार नाही, अशी तंबीही दिली.
स्मार्ट बससेवेसाठी शहरात १५० बसथांबे उभारण्याचे काम मुंबईच्या प्रो ॲक्टिव्ह कंपनीला २०१७ मध्ये दिले. कंपनीने स्वत:च्या पैशातून बसथांबे उभारावेत, त्यावर छोटे-छोटे होर्डिंग उभारून महसूल गोळा करावा, असे ठरले. नंतर कंपनीने स्मार्ट सिटीतील तत्कालीन झारीतील शुक्राचार्यांना हाताशी धरून बसथांब्याच्या बाजूला मोठे होर्डिंग उभारण्याचा निर्णय घेतला. कंपनी एवढ्यावरच थांबली नाही, तर दुभाजकात मोठ-मोठे उभारणीचे पत्रही स्मार्ट सिटीकडून घेतले. हे पत्र मिळताच पाच महिन्यांपासून शहरात १५० ठिकाणी होर्डिंग उभारणीला सुरुवात केली. होर्डिंग उभारणीचे नियम पायदळी तुडवत काम सुरू केले. त्यातील एक होर्डिंग सिडको उड्डाणपुलाच्या उलीकडे उभारले जात होते. त्यासाठी खड्डा केला, माती रस्त्यावर सोडून कंपनी निघून गेली. या मातीजवळ रिफ्लेक्टर रिबीन, बॅरिकेट्स उभारले नव्हते. त्यामुळे गॅस टँकर चालक डाव्या बाजूने जाताना अपघात झाला.
प्रो-ॲक्टिव्हला घेतले फैलावरशुक्रवारी सकाळीच प्रो ॲक्टिव्हच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जी. श्रीकांत यांनी बोलावून घेतले. त्यांना ‘तिसऱ्या हुकमापर्यंत’ फैलावर घेतले. काम थांबविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती प्रशासकांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्याला दिलेल्या कामाच्या स्वरूपाची तपासणी केली जाईल. मनपा मालमत्ता, वाहतूक पोलिस यांची एनओसी त्यासाठी हवी, असेही त्यांनी नमूद केले.
बसथांब्यावर सुविधांचा अभावस्मार्ट सिटीने प्रो ॲक्टिव्ह कंपनीला काम देताना बसथांब्यावर प्रवाशांना विविध सुविधा असाव्यात, असे करारात म्हटले आहेत. बस थांब्यावर पिण्याच्या पाण्याचीही सोय असावी, असे म्हटले आहे. आजपर्यंत ते काम न करता कंपनी निव्वळ कोट्यवधी रुपये कमविण्याच्या मागे लागली आहे. आता या सर्व प्रकारच्या अनागोंदीची चौकशी केली जाणार आहे.