लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील रामेश्वर ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या १६ गावांतून वीजदेयके भरली जात नसल्याने वीज खंडित केली होती. त्याविरोधात शिवसेनेच्या वतीने अचानक राष्ट्रीय महामार्गावरच बुधवारी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत रास्तारोको आंदोलन केल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत रामेश्वर, जलालपूर, लांडाळा, दौडगाव, चिंचोली निळोबा, उंडेगाव, हिवरखेडा, येळी, केळी, बेरूळा, केळी तांडा, सावळी पार्डी, सावळी तांडा यासह १६ गावांची वीज सोमवारी रात्रीपासून बंद केली होता. दोन दिवसांपासून अंधारातच असल्याने येथील ग्रामस्थांच्या वतीने वीज सुरू करण्याची विनंती महावितरण कंपनीला केली होती; परंतु ती मान्य न केल्याने संतप्त शिवसेनेचे तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर झटे, पांडुरंग नागरे, नंदू रवंदळे, अशोक दळवे, दिलीप वावटे, अच्युत इघारे, दत्तराव गीते, भास्कर इघारे, सुधाकर वैद्य यांच्यासह १६ गावांचे सरपंच, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी औरंगाबाद- नांदेड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रामेश्वर येथे सकाळी ११ वाजता रास्तारोको आंदोलन सुरू केले. जोपर्यंत वीज सुरळीत केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतल्या जाणार नसल्याची भूमिका घेतली होती. पोलीस निरीक्षक गणपत दराडे यांनी आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली; परंतु महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्याने तब्बल पाच तास आंदोलन सुरूच ठेवले होते. शेवटी तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी घटनास्थळी धाव घेत महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता जैन व आंदोलनकर्त्याशी चर्चा करून पुरवठा सुरळीत केला. त्यानंतरच आंदोलन मागे घेतले. वाहनांच्या रांगाच रांगाराष्ट्रीय महामार्गावर अचानक केलेल्या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुमारे ५-५ कि.मी. अंतरापर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा होत्या. फक्त रूग्णवाहिकेलाच रस्ता दिला होता; परंतु या रस्त्यावर साधे पिण्याचे पाणीही न झाल्याने प्रवाशांना त्रास झाला.
महावितरणविरुद्ध शिवसेनेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:01 AM