----
औरंगाबाद : महाराष्ट्र दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन पशुसंवर्धन हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना पशुवैद्यकीय परवानगी द्या. तसेच पशुवैद्यकीय सेवा देण्यास आणलेल्या निर्बंधांमुळे पशु पदविकाधारकांवर होणारी कारवाई थांबवण्याची मागणी पशुसेवक संघटनेने केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन समितीचे सभापती एल. जी. गायकवाड यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने निवेदन सुपूर्द केले.
निवेदनात, भारतीय पशुवैद्यकीय परिषद अधिनियम १९८४ कायदा रद्द करावा, नर्सिंगप्रमाणे पदविकाधारकांची नोंदणी करण्यात यावी. शासकीय पशुवैद्यकाच्या देखरेखीत खासगी पदविकाधारक पशुवैद्यकांना सेवा देण्यासाठी नोंदणी देऊन सेवा देण्याचा सक्तीचा नियम करावा. पशुवैद्यकीय दवाखान्यांचे श्रेणी २ मधून श्रेणी १ मध्ये श्रेणीवर्धन करावे. बोगस डाॅक्टर म्हणून हिनवणे थांबवा. त्या अनुशंगाने होणाऱ्या कारवाया थांबवाव्यात. १४ जुलैपासून राज्यभर पशुसेवा पदविकाधारकांनी थांबवली आहे. त्यामुळे वाड्या-वस्त्यांवरील पशुधनाची काळजी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे उद्धव काळे, सुनील सुंब, नितीन तागड, अर्जुन रावते, दत्तात्रय सुकाशे, सईस शेख, नूर पटेल, ज्ञानेश्वर काळवणे यांच्या सह्या आहेत. मागणीची योग्य ती दखल घेऊन सोडवू, असे आश्वासन उपाध्यक्ष गायकवाड यांनी दिले.